September 6, 2026 12:45 pm

राष्ट्र सेवा दलाचे ‘महात्मा फुले विचार संमेलन’ नोव्हेंबरमध्ये पुण्यात

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

२७, २८ आणि २९ नोव्हेंबरला तीन दिवसांचा विचार, साहित्य आणि संस्कृतीचा महोत्सव

पुणे : राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने राष्ट्रीय पातळीवरील ‘महात्मा फुले विचार साहित्य संमेलन’ पुण्यात दि. २७, २८ आणि २९ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या विचारांचा व्यापक जागर, सामाजिक समता, संविधानिक मूल्ये, साहित्य, कला आणि संस्कृती यांवर विविधांगी चर्चा घडवून आणली जाणार आहे.

या संमेलनात देशभरातील विचारक, भाष्यकार, अभ्यासक, संशोधक, लेखक, कवी, संपादक, पत्रकार, प्राध्यापक, कलाकार आणि सामाजिक कृतीवंत सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर ‘जेन झी’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध विद्यापीठांमधील तरुण विद्यार्थ्यांचाही सहभाग राहणार आहे. त्यामुळे विविध पिढ्या, विचारप्रवाह आणि सामाजिक अनुभव यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न या संमेलनाच्या माध्यमातून केला जाणार आहे.

विचारांसोबत साहित्य आणि संस्कृतीचीही मेजवानी

तीन दिवसांच्या या संमेलनात विविध विषयांवर विचारमंथन घडवून आणणारे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये पुस्तक प्रदर्शन, संविधान दालन, टॉक शो, मुलाखती, व्याख्याने, नाटक, गाणी आणि कविता सादरीकरण यांचा समावेश असेल.

तरुणांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे यासाठी ‘जेन झी’ आंदोलनातील तरुणांनी तयार केलेल्या पोस्टरचे प्रदर्शन तसेच तरुण व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांचे लाईव्ह प्रदर्शन हे संमेलनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

प्रकाशकांच्या पुस्तक दालनात ‘लेखक, कवी आपल्या भेटीला’ हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात येणार असून, यामुळे साहित्यप्रेमींना लेखक आणि कवींशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

महात्मा फुले विचारांचा जागर करण्याचा प्रयत्न

महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दीच्या निमित्ताने तसेच सामाजिक समतेच्या लढ्याशी संबंधित ऐतिहासिक घटनांच्या स्मरणार्थ राष्ट्र सेवा दलाकडून वर्षभर विविध उपक्रम राबविले जात आहेत.

महाड चवदार तळे सत्याग्रहाची शताब्दी, मनुस्मृती दहनाची शताब्दी आणि राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या आरक्षणाच्या निर्णयाला १२५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्र सेवा दलाने वर्षभर ‘विषमता निर्मूलन निर्धार वर्ष’ म्हणून विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून पुण्यात हे विचार, साहित्य आणि संस्कृती संमेलन आयोजित करण्यात येत आहे.

महात्मा फुले यांनी मांडलेले सामाजिक समता, शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, शोषणमुक्त समाज आणि विवेकवादी विचारांचे मूल्य आजच्या सामाजिक परिस्थितीत नव्याने समजून घेण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर फुले विचारांवर आधारित विविध चर्चासत्रे आणि कार्यक्रम संमेलनात होणार आहेत.

संमेलन समितीची स्थापना

या संमेलनाच्या आयोजनासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश असलेली संमेलन समिती स्थापन करण्यात आली आहे.

समितीत लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासणे, राजन गवस, प्रवीण बांदेकर, नीरज हातेकर, अलीम वकील, अरुण म्हात्रे, ज्ञानेश महाराव, निशिकांत कोलगे, आशालता कांबळे, विनोद शिरसाठ, लक्ष्मण यादव, हुबनाथ पांडे, प्रकाश दुबे, प्रदीप दाते, किशोर ढमाले, सुबोध मोरे, प्रतिमा परदेशी, सोमनाथ रोडे, सरफराज अहमद, सूरज येंगडे, जयवंत पाटील, अजित शिंदे आणि राजा कांदळकर यांचा समावेश आहे.

तर विशेष निमंत्रित म्हणून कपिल पाटील, सुभाष वारे, अंजली आंबेडकर, अभिजित वैद्य आणि नितीन वैद्य यांचा समावेश करण्यात आला आहे.

संमेलनाच्या आयोजनाबाबत सूचना आणि सहभागाचे आवाहन

महात्मा फुले यांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून होणारे हे संमेलन अधिक व्यापक आणि लोकाभिमुख व्हावे, यासाठी नागरिक, साहित्यिक, अभ्यासक, विद्यार्थी, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत.

संमेलनाचे स्वरूप, विषय, कार्यक्रम किंवा आयोजनाबाबत काही सूचना असल्यास त्या व्हॉट्सॲपद्वारे आयोजकांना कळवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच संमेलनात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी इच्छुकांनी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्र सेवा दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्क :

  • रोहित ढाले : 9869819878
  • सागर भालेराव : 9967055630
  • प्रशांत इंगळे : 9420889862
  • अभिजित आंब्रे : 8605400373

महात्मा फुले यांच्या परिवर्तनवादी विचारांना आजच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संदर्भांशी जोडत नव्या पिढीशी संवाद साधणारे हे तीन दिवसीय संमेलन ठरणार असून, विचार, साहित्य आणि संस्कृतीच्या माध्यमातून समताधिष्ठित समाजाच्या दिशेने नव्या चर्चेला चालना देण्याचा प्रयत्न या संमेलनातून केला जाणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!