September 6, 2026 1:48 pm

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प मूळ मार्गानेच झाला पाहिजे; सर्वपक्षीय आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा – माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मंचर, दि. ७ : खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प मूळ प्रस्तावित मार्गानेच पूर्ण झाला पाहिजे, अशी ठाम भूमिका माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच, रविवारी (दि. ९) होणाऱ्या सर्वपक्षीय जनआंदोलनाला आपण संपूर्ण पाठिंबा देत असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.

आढळराव पाटील म्हणाले की, खासदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाची संकल्पना मांडली आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. जवळपास बारा वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात या प्रकल्पाला २ हजार ४२५ कोटी रुपयांची मंजुरी दिली होती. त्यावेळी रेल्वेचा मार्ग चाकण–खेड–मंचर–नारायणगाव–आळेफाटा–संगमनेर–सिन्नर असा निश्चित करण्यात आला होता.

ते पुढे म्हणाले की, पुढील काळात हा प्रकल्प दुहेरी मार्गाचा तसेच देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१९ पर्यंत प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे १६ हजार ३९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. मात्र, त्यानंतर मूळ मार्गाला वगळून पर्यायी मार्गाचा विचार सुरू झाल्याने खेड, आंबेगाव आणि जुन्नर या भागांच्या विकासावर विपरीत परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. या भागातील उद्योग, व्यापार, पर्यटन, शिक्षण, रोजगार आणि वाहतूक व्यवस्थेला चालना देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मूळ मार्गानेच झाला, तर संपूर्ण परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जीएमआरटी (GMRT) संशोधन केंद्रामुळे रेल्वे प्रकल्पाला अडथळा निर्माण होतो, हा दावा वस्तुस्थितीला धरून नसल्याचेही त्यांनी नमूद केले. गेल्या वीस वर्षांत जीएमआरटीमुळे कोणत्याही विकासकामात अडथळा निर्माण झालेला नसून, तांत्रिकदृष्ट्या रेल्वे आणि जीएमआरटी हे दोन्ही प्रकल्प एकत्रितपणे कार्यान्वित राहू शकतात, हे सिद्ध करणारी माहिती आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला.

मूळ रेल्वे मार्गासाठी अंतिम निर्णय होईपर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, या विषयावर स्थानिक जनतेच्या भावना आणि विकासाच्या अपेक्षा लक्षात घेऊन शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, जीएमआरटीच्या संशोधन कार्यास कोणतीही बाधा न आणता पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मूळ अथवा थेट मार्गाने नेता येईल का, याचा अभ्यास करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी स्वागत केले. मात्र, ही समिती यापूर्वीच स्थापन झाली असती, तर प्रकल्पाला होणारा विलंब टाळता आला असता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

आढळराव पाटील यांनी सांगितले की, पूर्वनियोजित कामानिमित्त ते ७ ते १४ ऑगस्ट या कालावधीत बाहेरगावी असणार असल्यामुळे दि. ९ रोजी होणाऱ्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होता येणार नाही. तरीही आंदोलनाच्या उद्दिष्टांशी आपण पूर्णपणे सहमत असून या लढ्याला आपला नैतिक आणि राजकीय पाठिंबा कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

“पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प हा केवळ रेल्वे मार्ग नसून उत्तर पुणे जिल्ह्याच्या विकासाचा कणा आहे. त्यामुळे हा प्रकल्प मूळ मार्गानेच पूर्ण होणे हीच जनतेची अपेक्षा असून त्यासाठीचा लढा शेवटपर्यंत सुरू राहील,” असा निर्धारही माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!