पुणे, दि. ७ : शहरात सुरू असलेल्या मतदारयादींच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेमुळे पुणे महापालिकेच्या नियमित विकासकामांवर परिणाम होत असल्याचे चित्र समोर आले आहे. विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर एसआयआरच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आल्याने अनेक नागरी कामांचा वेग कमी झाला आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनीही या परिस्थितीची दखल घेतली आहे.
सध्या राज्यभर मतदारयाद्या अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. पुणे शहरातही ही मोहीम प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांतील मनुष्यबळ या कामात गुंतविण्यात आले आहे. वरिष्ठ स्तरावर या मोहिमेचा सातत्याने आढावा घेतला जात असून, निश्चित कालावधीत प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
यामुळे महापालिकेच्या मिळकतकर, पथ, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, बांधकाम, अतिक्रमण नियंत्रण आणि इतर महत्त्वाच्या विभागांतील दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. क्षेत्रीय पाहणी, तांत्रिक अहवाल, निविदा मंजुरी, नागरिकांच्या अर्जांवरील सुनावणी तसेच इतर प्रशासकीय प्रक्रिया अपेक्षित वेगाने होत नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात खड्डे, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्त्यांची दुरुस्ती आणि अतिक्रमण यांसारख्या नागरी समस्या वाढल्या आहेत. मात्र, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी एसआयआर मोहिमेत व्यस्त असल्यामुळे नागरिकांच्या अनेक तक्रारींच्या निवारणाला विलंब होत आहे.
महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, एसआयआर मोहीम पूर्ण झाल्यानंतर सर्व विभागांना पुन्हा विकासकामांवर पूर्ण क्षमतेने लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात येतील. नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे नियोजनही करण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासनासमोर सध्या निवडणूक प्रक्रियेतील जबाबदारी आणि शहरातील विकासकामे या दोन्ही बाबींचा समतोल राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असून, एसआयआर मोहीम पूर्ण झाल्यानंतर विकासकामांना पुन्हा गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











