पुणे | प्रतिनिधी
राज्यात अमली पदार्थांच्या अवैध तस्करी आणि विक्रीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (एएनटीएफ)च्या समन्वयातून पुणे आणि धुळे जिल्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या तब्बल ९,५३६ किलो अमली पदार्थांची कायदेशीर आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. नष्ट करण्यात आलेल्या या अमली पदार्थांची अंदाजे किंमत ₹१२ कोटी २९ लाखांपेक्षा अधिक असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
जप्त अमली पदार्थांची विल्हेवाट पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील एन्व्हायरो पॉवर लिमिटेड येथे न्यायालयाच्या आदेशानुसार आणि प्रचलित कायदेशीर नियमांचे काटेकोर पालन करून करण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली असून, पर्यावरण संरक्षणाच्या सर्व निकषांचे पालन करण्यात आले. या वेळी संबंधित विभागांचे अधिकारी तसेच ड्रग डिस्पोजल समितीचे सदस्य उपस्थित होते.
या विशेष कारवाईमध्ये उच्चस्तरीय ड्रग डिस्पोजल समिती (एचएलडीडीसी) मार्फत ३,१५१ किलो, तर घटकस्तरीय ड्रग डिस्पोजल समिती (आरडीडीसी) मार्फत ६,३८५ किलो अमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली. अशा प्रकारे एकूण ९,५३६ किलो अमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यात विविध कारवायांदरम्यान मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त करण्यात आला होता. तसेच पुणे जिल्ह्यातही अमली पदार्थांच्या अवैध साठ्यांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या दोन्ही जिल्ह्यांतील जप्त अमली पदार्थांची नियमानुसार विल्हेवाट लावल्याने ड्रग माफियांच्या आर्थिक साखळीला मोठा फटका बसल्याचे मानले जात आहे.
एएनटीएफच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, राज्यात अमली पदार्थांची तस्करी, साठवणूक आणि विक्री करणाऱ्या टोळ्यांविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्र केल्या जाणार आहेत. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांचा पुन्हा कोणत्याही प्रकारे गैरवापर होऊ नये, यासाठी त्यांची वेळोवेळी न्यायालयीन आदेशानुसार विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सातत्याने राबविली जात आहे.
राज्यात ‘अमली पदार्थमुक्त समाज’ निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलीस, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स आणि संबंधित यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत. केवळ तस्करांविरोधात कारवाई करण्यापुरते मर्यादित न राहता, अमली पदार्थांचे उत्पादन, वाहतूक, साठवणूक आणि वितरण करणाऱ्या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठीही विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या मोठ्या कारवाईमुळे राज्यातील अमली पदार्थविरोधी मोहिमेला आणखी बळ मिळाले असून, ड्रग माफियांना कठोर संदेश देण्यात यश आल्याचे मानले जात आहे. भविष्यातही अशा धडक कारवाया सातत्याने सुरू ठेवून अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्याचा निर्धार संबंधित यंत्रणांनी व्यक्त केला आहे.











