पुणे | प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एका पोलीस पाटलाची ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने तब्बल ५६ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियावरील आकर्षक गुंतवणूक जाहिरातीच्या माध्यमातून संपर्क साधत स्वतःला “सिया” असे नाव सांगणाऱ्या एका महिलेने आणि तिच्या साथीदारांनी मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
विशेष म्हणजे, अलीकडेच पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी सिया गोयलची चर्चा सुरू असतानाच, आता “सिया” नाव सांगणाऱ्या आणखी एका कथित महिलेच्या नावाचा वापर करून ऑनलाइन गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, या दोन्ही प्रकरणांचा परस्परांशी संबंध असल्याचे कोणतेही अधिकृत संकेत पोलिसांनी दिलेले नाहीत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत तक्रारदार पोलीस पाटील सोशल मीडियावरील एका आकर्षक गुंतवणूक जाहिरातीच्या संपर्कात आले. ही जाहिरात एका नामांकित ब्रोकरेज कंपनीच्या नावाने असल्याचा भास निर्माण करण्यात आला होता. जाहिरातीवर क्लिक करताच त्यांना व्हॉट्सॲपवरील एका गुंतवणूक ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले.
या ग्रुपमध्ये स्वतःला “सिया” असे नाव सांगणाऱ्या महिलेने त्यांच्याशी संवाद साधला. तिने शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांच्या मोबाईलमध्ये एक ट्रेडिंग ॲप इन्स्टॉल करण्यास सांगितले. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी त्या ॲपमध्ये बनावट नफा आणि वाढती गुंतवणूक दाखवण्यात आली. त्यानंतर सवलतीच्या दरात आयपीओ शेअर्स उपलब्ध करून देण्याचे, कमी कालावधीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आणि गुंतवणुकीची रक्कम अनेक पटींनी वाढेल, असे आमिष दाखवत वेळोवेळी अधिक पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करण्यात आले.
या आमिषाला बळी पडून तक्रारदाराने विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण ५६ लाख २५ हजार रुपये जमा केले. त्यानंतर ट्रेडिंग ॲपवरील डॅशबोर्डमध्ये त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य तब्बल १० कोटी रुपये झाल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे आपल्याला मोठा नफा मिळाल्याचा विश्वास तक्रारदाराला बसला.
मात्र, जेव्हा त्यांनी ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी ३० लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून भरल्याशिवाय पैसे मिळणार नसल्याचे सांगितले. ही मागणी संशयास्पद वाटल्याने तक्रारदाराने अतिरिक्त रक्कम भरण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याशी सर्व संपर्क तोडला आणि गुंतवलेली रक्कमही परत केली नाही.
आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर संबंधित पोलीस पाटलाने पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी स्वतःला “सिया” असे संबोधणाऱ्या महिलेसह इतर अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सायबर आणि आर्थिक गुन्हे अन्वेषणाशी संबंधित पथके आरोपींचा शोध घेत असून, या प्रकरणातील बँक व्यवहारांची साखळी, वापरण्यात आलेली बँक खाती, मोबाईल क्रमांक, आयपी अॅड्रेस आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू आहे.
दरम्यान, सोशल मीडियावरील गुंतवणूक जाहिराती, व्हॉट्सॲप ग्रुप आणि अनधिकृत ट्रेडिंग ॲप्सच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचे प्रकार सातत्याने वाढत असल्याबद्दल पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनी किंवा प्लॅटफॉर्मची अधिकृत पडताळणी करावी, केवळ सोशल मीडियावरील जाहिराती किंवा अनोळखी व्यक्तींच्या सल्ल्यावर विश्वास ठेवू नये आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्यास तातडीने पोलिस किंवा सायबर हेल्पलाइनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.











