पुणे, : शहरात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी इंजेक्शनच्या बेकायदा विक्रीवर आंबेगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे. आरोपींकडून मेफेंटरमाईन सल्फेट (मेफिवान) या औषधी इंजेक्शनच्या ५० बाटल्या जप्त करण्यात आल्या असून, ही इंजेक्शने जादा दराने बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या कारवाईमुळे शहरातील नशेच्या वाढत्या जाळ्यावर पोलिसांनी प्रभावी प्रहार केला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
अथर्व इंद्रजित शिंदे (वय २४, रा. उर्मिला सोसायटी, गुलाबनगर, धनकवडी), अविनाश शिवा बळुंगी (वय २२, रा. छत्रपती संभाजीनगर, धनकवडी),
प्रदीप जितेंद्र हुंबरे (वय २६, रा. सिद्धीविनायक सोसायटी, आंबेगाव),
पीयूष गणेश भरम (वय २६, रा. कचरावत चाळ, आंबेगाव) आणि लक्ष्मण परमेश्वर माने (वय १९, रा. माने निवास, साईसिद्धी चौक, आंबेगाव) अशी आहेत.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी नितीन कातुर्डे यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै रोजी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास कात्रज-दत्तनगर रस्त्यावर काही जण नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने घटनास्थळी सापळा रचला.
संशयित आरोपी घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील पिशवीची तपासणी केली. तपासणीदरम्यान मेफेंटरमाईन सल्फेट (मेफिवान) इंजेक्शनच्या ५० बाटल्या आढळून आल्या. या इंजेक्शनचा वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वापर करणे धोकादायक असून, काही जण शरीरसौष्ठवासाठी तसेच नशा करण्यासाठी त्याचा गैरवापर करत असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. तपासात या इंजेक्शनची बेकायदेशीररीत्या जादा दराने विक्री केली जात असल्याचेही उघड झाले आहे.
औषधांच्या नियमांचे उल्लंघन करून ही विक्री केली जात असल्याचा संशय असून, या प्रकरणातील पुरवठा साखळी, इंजेक्शनचा स्रोत आणि इतर संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत इंजेक्शनचा पुरवठा कोठून होत होता, आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच शहरात अशा प्रकारचे रॅकेट कार्यरत आहे का, याचा सखोल तपास केला जाणार आहे.
ही कारवाई आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक चांगदेव सजगणे, सहायक पोलिस निरीक्षक स्वाती देवधर, पोलिस उपनिरीक्षक युवराज शिंदे, तसेच पोलिस कर्मचारी नितीन कातुर्डे, अजय कामठे आणि सुभाष मोरे यांच्या पथकाने केली.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध किंवा इंजेक्शन वापरू नये. औषधांची बेकायदेशीर विक्री, नशेसाठी औषधांचा वापर किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. शहरात नशेच्या विरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असून अशा बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Post Views: 18










