धारदार शस्त्रासह रिल बनवून दहशत निर्माण करणाऱ्या युवकास पोलिसांनी जुना जालना भागात अटक केली. त्याच्याजवळून एक कोयता आणि एक खंजीर पोलिसांनी जप्त केला आहे.
धारदार शस्त्रासह रिल बनवून ती समाज माध्यमांवर प्रसारित करणारा एक युवक कोयता घेऊन जुना जालना भागातील माळीपुरा आणि देहेडकरवाडी भागात फिरत असल्याची माहिती कदीम जालना पोलिसांना दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास मिळाली होती.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने दोन पंच सोबत घेऊन पाहणी केली असता त्यांना एक संशयित युवक दिसला. पोलिस पथकास पाहून पळून जाताना त्यास ताब्यात घेण्यात आले.
अजय गणेश खरात (२२) असे या युवकाचे नाव असून तो जालना शहरातील लक्कडकोट- संभाजीनगर भागातील रहिवाशी आहे. त्याच्या जवळून लोखंडी धारदार ३५ से.मी. लांबीचा खंजीर आणि गंज लागलेला ५१ सें.मी. लांबीचा कोयता पोलिसांनी जप्त केला. त्याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जालना शहरातील सदर बाजार पोलिसांनी दाखल केलेल्या एका गुन्हयातही तो आरोपी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
गेल्या १९ मे रोजीही पोलिसांनी जुना जालना भागात हातात खंजीर घेऊन जोरजोरात ओरडणाऱ्या व्यक्तीस रात्री पाऊणे दहा वाजण्याच्या सुमारास अटक केली. पोलिसांनी त्याच्याजवळून ४५ सें. मी. लांबीचा खंजीर जप्त केला. विरेन्द्र लक्ष्मणराव खैरे (४२) असे या इसमाचे नाव असून जालना शहरातील मस्तगड भागातील हनुमान टेकडी येथील तो रहिवाशी आहे.
कदीम जालना पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला. गेल्या १८ मे रोजीही चंदनझिरा पोलिसांनी औद्योगिक वसाहतीत धारधार तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या युवकास अटक केली. सय्यद साबेर सय्यद निसार (२२) असे या युवकाचे नाव असून जालना शहरातील नूतन वसाहत भागातील तो रहिवाशी आहे. १७ मे रोजीही चंदनाझरा पोलिसांच्या हद्दीतील पद्मावतीनगर भागात तलवार घेऊन फिरणाऱ्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी अटक केली.











