NEET पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी आणि ‘आरसीसी’ (RCC) कोचिंग क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर याच्या अटकेनंतर भाऊ राजू मोटेगावकर यांनी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर येत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर त्यांनी संस्थेची पुढील भूमिका स्पष्ट केली. शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर आरसीसी क्लासेसचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच राजू मोटेगावकर यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नसल्याची ग्वाही दिली.
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता आम्ही टेस्ट सीरिज पुन्हा सुरू केली आहे. आज टेस्ट सीरिजचा पहिला पेपर झाला असून, त्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. जरी सर (शिवराज मोटेगावकर) सध्या नसले, तरी आमची टीम अत्यंत व्यवस्थितपणे काम करत आहे आणि राज्यातील सर्व शाखा पूर्ववत सुरू राहतील, असे देखील राजू मोटेगावकर म्हणाले.
पेपरफुटीच्या गंभीर आरोपांबाबत बोलताना राजू मोटेगावकर यांनी थेट भाष्य करणे टाळले, मात्र कायदेशीर प्रक्रियेवर बोलताना ते म्हणाले, प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्यावर अधिक बोलणे योग्य नाही. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे.
राजू मोटेगावकर यांनी पुढे बोलताना म्हणाले. या कठीण काळातही ज्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ‘आरसीसी’वर आपला विश्वास कायम ठेवला, त्यांचे मी मनापासून आभार मानतो रेग्युलर टेस्ट सीरिज आणि डाऊट सॉल्व्हिंगचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ही मालिका 19 जूनपर्यंत सुरू राहील. सध्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही टेस्ट सीरिज पार पडणार आहे आगामी 21 तारखेची परीक्षा याशिवाय आमच्या डोक्यात दुसरा कोणताही विचार नाही.
मोटेगावकरच्या आरसीसीच्या शाखा लातूरसह राज्यात 9 ठिकाणी आहेत. या माध्यमातून त्याची जवळपास 100 कोटींची उलाढाल होत होती. 23 वर्ष क्लासेस चालवून मोटेगावकरनं आपलं साम्राज्य उभारलंय. त्याच्या क्लासला प्रवेश मिळवायचा असेल तर वार्षिक 80 हजार रुपये फी होती. शिवाय राहणे आणि खानावळीचे पैसे वेगळे. एका विद्यार्थ्याला साधारण 1 लाख 20 हजार ते दीड लाखांपर्यंत खर्च यायचा एका विद्यार्थ्याकडून साधारण दीड लाखापर्यंत मोटेगावकर पैसे घेत होता. नीट परीक्षेत चांगले गुण मिळाल्यानं प्रत्येक वर्षी क्लासमधील 10 ते 15 मुलांना चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळायचा, याचंच भांडवल करून मोटेगावकर लाखोंच्या जाहिराती द्यायचा. त्यामाध्यमातून हजारो प्रवेशांची पुन्हा तजवीज होत असे.











