नागपूर येथील एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मुलगी बेपत्ता झाली होती. मुलगी हरवल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. पण, तिथे गेल्यावर शोधमोहीम सुरू करण्यासाठी ‘आमच्या गाडीत डिझेल नाही, त्यामुळे शोधासाठी जात येत नाही,’ असे उत्तर पोलिसांकडून देण्यात आलं होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच शहरात अशाप्रकारची घटना समोर आल्यानं एकच संताप व्यक्त केला जात होता. यावर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकीकडे पेट्रोल-डिझेलचा तुटवडा काही ठिकाणी जाणवतांना पाहायला मिळतोय. त्याचा कुठेतरी पोलिसांना देखील फटका बसल्याचं दिसतंय. नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मुलगी बेपत्ता झाली होती. तेव्हा, मुलीच्या कुटुंबीयांनी लागलीच पोलिसांकडे धाव घेतलेली. पण, पोलिसांनी ‘गाडीत डिझेल नाही, त्यामुळे मुलीच्या शोधासाठी जाता येत नाही’ असे उत्तर कुटुंबीयांना दिलं होतं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
याची गंभीर दखल घेऊन संबंधीत पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “कुठेही पोलिसांसाठी पेट्रोल आणि डिझेलची कमतरता नाही. सगळीकडे पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध आहे. नागपुरात एका ठिकाणी पेट्रोल उपलब्ध असताना सुद्धा पोलिसाने अतिशय बेजबाबदार उत्तर दिलंय. त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे.”
“केंद्र सरकारने सांगितलंय की, ‘आमच्याकडे पेट्रोल डिझेलचा साठा आहे. त्याचा योग्यप्रकारे पुरवठा देखील होत आहे.’ पण, विनाकारण घाबरवलं जाते. एखाद्या पेट्रोल पंपावर किती पेट्रोल लागतं, याआधारावर पुरवठा सुरू असतो. अचानक जेव्हा अफवांवर लोक अधिकचे पेट्रोल खरेदी करतात. तेव्हा, अडथळा निर्माण होतो. याचा अर्थ साठा कमी नाही, असे नाही. जागतिक परिस्थिती वाईट असतानाही आपल्याकडे सुरळीत इंधन पुरवठा आहे. पण, घाबरून अधिकचे इंधन घेण्यास सुरूवात केली तर पुरवठा सुरळीत राहू शकणार नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केले.











