June 5, 2026 6:51 am

पेपर फोडणाऱ्या वाटल्या नाहीत, दोन मनिषांबाबत शेजारी चकित

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

ब्यूटी पार्लरमध्ये ओळख, घरात खासगी कोचिंग क्लास आणि त्यातून ‘नीट’च्या पेपरफुटीचे जाळे उभे राहिल्याची धक्कादायक माहिती ‘सीबीआय’च्या तपासातून समोर आली आहे.

कात्रज परिसरात राहणाऱ्या मनीषा वाघमारे आणि मॉडर्न महाविद्यालयातील शिक्षिका मनीषा मांढरे यांची ओळख एका ब्यूटी पार्लरमधून झाली आणि पुढे त्याच ओळखीचे रूपांतर नीट पेपरफुटी रॅकेटमध्ये झाल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे.

‘सीबीआय’ने अटक केलेल्या मनीषा गुरुनाथ मांढरे या ‘नीट-यूजी २०२६’च्या प्रक्रियेत तज्ज्ञ म्हणून सहभागी होत्या. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) त्यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे त्यांना वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत थेट प्रवेश होता. दुसरीकडे, मनीषा वाघमारे हिची विद्यार्थी आणि पालकांमध्ये ओळख होती. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही मनीषा कात्रज परिसरात राजस सोसायटीजवळील गंगा ओशन सोसायटीत राहात होत्या.

वाघमारे यांच्या ब्यूटी पार्लरमध्ये मनीषा मांढरे नियमित येत असत. त्याच ठिकाणी दोघींची ओळख झाली. सुरुवातीला सामान्य परिचय असलेले संबंध नंतर अधिक घट्ट झाले. मांढरे यांनी त्यांच्या शिक्षकी पेक्षा आणि नोकरीच्या स्वरूपाबाबत मनीषा वाघमारेला माहिती दिली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मांढरे यांनी वाघमारेची मदत घेतल्याचा संशय आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना गुप्तपणे संपर्क करून वाघमारे-मांढरेंच्या निवासस्थानी विशेष कोचिंग क्लास सुरू करण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात घेतलेल्या या क्लासमध्ये विद्यार्थ्यांना बॉटनी आणि झूलॉजी विषयांतील संभाव्य प्रश्न समजावून सांगितले जात होते. प्रश्न वहीत लिहून घेण्यास; तसेच पुस्तकांमध्ये मार्क करून ठेवण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. विशेष म्हणजे, या क्लासमध्ये सांगण्यात आलेले अनेक प्रश्न प्रत्यक्ष तीन मे २०२६ रोजी झालेल्या ‘नीट-यूजी’च्या प्रश्नपत्रिकेशी जुळल्याचे तपासात आढळले आहे.

या प्रकरणात रसायनशास्त्राचे व्याख्याते पी. व्ही. कुलकर्णी यांचेही नाव पुढे आले आहे. तेही ‘एनटीए’च्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होते आणि प्रश्नपत्रिकांपर्यंत त्यांचा प्रवेश होता. कुलकर्णी यांनीही मनीषा वाघमारेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संपर्क करून खासगी मार्गदर्शन वर्ग घेतल्याचे ‘सीबीआय’ने म्हटले आहे. या वर्गांमध्ये त्यांनी प्रश्न, पर्याय आणि योग्य उत्तरे विद्यार्थ्यांना सांगितल्याचा आरोप आहे.

आरोपी मनीषा वाघमारे हिचा पती दंतवैद्यकीय तज्ज्ञ असल्याची माहिती समोर आली आहे, तर मनीषा मांढरे या पतीपासून विभक्त राहत असाव्यात, असा अंदाज स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केला. या दोघी पेपर फुटीसारख्या विषयात सक्रिय असतील, असे कधी वाटले नव्हते, असे दोन रहिवाशांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!