June 5, 2026 7:30 am

भुसावळमध्ये चक्क १७ वर्षे लपून राहिली बांगलादेशी महिला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असताना, काही दिवसांपूर्वी एक तरुणी जळगाव शहरात आढळली होती. त्यानंतर आता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एका बांगलादेशी महिलेचा शोध घेण्यात मोठे यश मिळाले आहे.

बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्यास राहणाऱ्या या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणामुळे सुरक्षा यंत्रणांमध्येही खळबळ उडाली आहे.

पोलीस तपासात संशयित महिलेचे मूळ नाव फरीदा बेगम मोहम्मद खान (४२) असे असल्याचे निष्पन्न झाले आहे. ती मूळची बांगलादेशातील भीमकाठी (उपजिल्हा नाझीरपूर, जिल्हा पीरोजपुर) येथील रहिवासी आहे. भारतात आल्यानंतर तिने स्वतःची ओळख लपवण्यासाठी “जस्मिन बी मोहम्मद खान” हे नाव धारण केले होते. या नावाने ती गेल्या अनेक वर्षांपासून भुसावळ शहरातील दीनदयाल नगर परिसरात वास्तव्यास होती. स्थानिक पातळीवर भारतीय नागरिक असल्याचे भासवून ती सामान्य नागरिकांमध्ये मिसळून राहत असल्याचे तपासात उघड झाले आहे. भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संबंधित महिलेची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला तिने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तांत्रिक आणि दस्तऐवजी पुराव्यांच्या आधारे कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.

प्राथमिक चौकशीत संशयित महिलेने सन २००९ मध्ये एका मध्यस्थाच्या मदतीने बांगलादेशातून भारतात बेकायदेशीर प्रवेश केल्याची कबुली दिली. यासाठी तिने मध्यस्थाला पाच हजार रुपये दिले होते. नदीमार्गे बोटीच्या सहाय्याने ती प्रथम पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली. त्यानंतर रेल्वेमार्गे भुसावळ येथे पोहोचल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी संशयिताकडून सॅमसंग कंपनीचा भ्रमणध्वनी जप्त केला. या भ्रमणध्वनीचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असता आएमओ आणि व्हाटस्ॲपच्या माध्यमातून बांगलादेशातील +८८० कंट्री कोड असलेल्या अनेक भ्रमणध्वनी क्रमांकांशी सातत्याने संपर्क झाल्याचे उघड झाले. भ्रमणध्वनीमध्ये चॅटिंग, व्हिडिओ कॉल तसेच इतर संवादांचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. याशिवाय संशयित महिलेच्या मोबाईलमध्ये तिच्या बांगलादेशातील जन्म दाखल्याची प्रत आढळून आल्याने तिची खरी ओळख निश्चित करण्यात पोलिसांना मदत झाली.

पुढील चौकशीत संशयित महिलेने अत्यंत चलाखीने भारतीय कागदपत्रे मिळवल्याचे समोर आले आहे. तिच्या मृत बहिणीच्या नावावरील लाईट बिल तसेच इतर स्थानिक कागदपत्रांचा वापर करून तिने स्वतःचे रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि भारतीय पासपोर्ट तयार करून घेतल्याचे उघड झाले आहे. या सर्व बनावट कागदपत्रांच्या आधारे ती अनेक वर्षे भारतात राहत होती. विशेष म्हणजे बनावट भारतीय पासपोर्टच्या आधारे संशयित महिला मे २०२३ मध्ये बांगलादेशात जाऊन पुन्हा भारतात परत आल्याची धक्कादायक बाबही तपासातून पुढे आली आहे. त्यामुळे संबंधित प्रकरण केवळ बेकायदेशीर वास्तव्यापुरते मर्यादित नसून बनावट दस्तऐवज रॅकेट आणि आंतरराष्ट्रीय हालचालींशी संबंधित मोठे नेटवर्क कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात महिलेला बनावट कागदपत्रे तयार करून देणारे एजंट, मध्यस्थ तसेच संबंधित व्यक्तींचा शोध पोलीस घेत आहेत. महिलेला भारतीय नागरिकत्वासारखी ओळख निर्माण करून देण्यासाठी कोणत्या स्तरावर मदत झाली, याचाही तपास सुरू आहे. यामध्ये काही स्थानिक व्यक्ती किंवा संघटित टोळीचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. तांत्रिक तपास, आर्थिक व्यवहार, मोबाईल डेटा आणि कागदपत्रांची शहानिशा यावर भर दिला जात आहे. दरम्यान, जळगाव पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या, बनावट कागदपत्रांच्या आधारे राहत असलेल्या किंवा ओळख लपवून वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!