कोयना धरणाच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज जलाशयात सावरी- सोनाडी पुलानजीक बुधवारी (ता. १३) बोट दुर्घटना घडली होती. वादळी वाऱ्यात उलटलेल्या बोटीत मुंबईचे पर्यटक दांपत्य पोहून सुरक्षितपणे बाहेर निघाले.
मात्र, बोटचालक बेपत्ता झाला होता. दरम्यान, बेपत्ता बोट चालकाचा मृतदेह गुरुवारी दुपारी सापडला. रूपेश धोंडीबा तांबे (वय ४५, रा. तापोळा) असे मृत चालकाचे नाव आहे. या घटनेमुळे तापोळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार वळीव पावसामुळे कोयना जलाशयात मोठ्या लाटा निर्माण झाल्या होत्या. यावेळी पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीड बोट अचानक उलटली. त्यात मुंबई येथील दांपत्यासह चालक रूपेश तांबे होते.
दुर्घटनेनंतर दांपत्याने लाइफ जॅकेटच्या साहाय्याने पोहत सुरक्षित किनारा गाठला. मात्र, चालक रूपेश तांबे हे बुडाले होते. रूपेश हा पट्टीचा पोहणारा असला, तरी जोरदार लाटांमुळे त्याला बाहेर पडता आले नाही.
घटनेनंतर स्थानिक नागरिक, बोट व्यावसायिक, तसेच शिवसागर बोट क्लबचे अध्यक्ष आनंद धनावडे यांच्या माध्यमातून शोध कार्य सुरू होते. अखेर गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जलाशयात बुडालेल्या अवस्थेत रूपेश तांबे यांचा मृतदेह आढळून आला.
त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, कोयना जलाशय परिसरातील सर्व बोट चालक व व्यावसायिकांनी पर्यटकांच्या, तसेच स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.










