महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य असलेल्या ‘ओंकार उद्योग समूहा’सह (साखर कारखाना समूह) उद्योगपती बाबुराव बोत्रे पाटील यांची सोशल मीडियाद्वारे बदनामी केल्याप्रकरणी रवीराज साबळे-पाटील यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोटी, दिशाभूल करणारी आणि चिथावणीखोर विधाने करून शेतकरी व कामगारांमध्ये अविश्वास निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
रणजीत बापूराव तावरे (वय-50, व्यवसाय ओंकार शुगर कारखाना युनिट नं 11 कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखाना बिजवडी, इंदापुर मध्ये जनरल मॅनेजर, रा. महात्मा फुले नगर, बिजवडी, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार रवीराज साबळे-पाटील (रा.भुम ता. परांडा जिल्हा धाराशिव) याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवीराज साबळे पाटील याने त्याच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम आयडीवरून 29 एप्रिल 2026 रोजी एक व्हिडिओ प्रसारित केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने ओंकार उद्योग समूहाबाबत आणि बाबुराव बोत्रे पाटील यांच्या संदर्भात कोणतेही पुरावे नसताना खोटी व बिनबुडाची माहिती दिली होती. या व्हिडिओमुळे कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखाना (बिजवडी) आणि समूहाच्या इतर 17 युनिट्समधील शेतकरी, कामगार आणि वाहतूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ओंकार शुगर कारखान्याचे जनरल मॅनेजर रणजीत तावरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, “आरोपीने द्वेषापोटी आणि स्पर्धकांच्या सांगण्यावरून कारखान्याचे नुकसान करण्याच्या हेतूने हा अपप्रचार केला आहे. व्हिडिओमध्ये नमूद केलेली शेतकऱ्यांची थकीत बिले आणि कामगारांच्या पगाराबाबतची विधाने पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी आहेत.” रवीराज साबळे पाटील याच्या या कृत्यामुळे समूहाची सामाजिक प्रतिष्ठा आणि व्यावसायिक प्रतिमेला गंभीर धक्का पोहोचला आहे.
दरम्यान, याप्रकरणी तावरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी साबळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५६, ३५३(१) आणि ३५२, नुसार माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) कलम ६७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे करत आहेत.










