सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना खाद्य घातल्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरत असल्यामुळे वसई विरार महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना दाणे टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन केल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वी दादर येथील कबूतर खाना परिसरात कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य देण्यावरून झालेल्या वादानंतर वसई विरार महापालिकेनेदेखील याबाबत खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे. वसई विरार शहरातील रस्ते, बस थांबे आणि बस आगार, मोकळी मैदाने, धार्मिक स्थळे, तसेच तलावंशेजारील मोकळ्या जागेत पक्ष्यांना खाऊ घातले जाते.
यामुळे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात आलेले हे खाद्य कुजून, तसेच पक्षांची विष्ठा आणि पिसे पडून दुर्गंधी पसरू लागली. यामुळे नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करणे कठीण होऊन बसले आहे. तर यामुळे परिसरातील अस्वच्छता देखील वाढत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असून वसई विरार शहरात सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांची दाणे टाकण्यास प्रतिबंध करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती.
याच मागणीची दखल घेत महापालिकेकडून शहरात सार्वजनिक ठिकाणी मोकळ्या जागेत पक्ष्यांना दाणे टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून त्यांना ५०० रुपये इतका दंड भरावा लागणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त जितेंद्र नाईक यांनी दिली आहे.
वसई विरार शहरातील स्वच्छता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महापालिकेने पक्ष्यांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य देण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय जारी घेतला असला. तरी त्याची योग्य ती जनजागृती केली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. महापालिकेच्या या नव्या धोरणाबाबत माहिती देणारा सूचनात्मक फलक फक्त वसई रेल्वे स्थानक परिसरातच लावण्यात आला असून इतरत्र कुठेही असे फलक निदर्शनास येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वसई विरार शहरात टेरेस, इमारतींचे आवार, चौक अशा विविध ठिकाणी कबुतरांना दाणे टाकले जात असल्यामुळे त्यांच्या संख्येत मोठी वाढ झालीआहे.कबुतरांच्या विष्ठेमुळे तसेच त्यांच्या पिसांमुळे अनेक जीवाणू आणि बुरशीजन्य आजार पसरतात. त्यामुळे खाजगी परिसरातही पक्ष्यांना खाद्य देणाऱ्यांवर ठोस कारवाई करावी अशी मागणी आता महापालिकेकडे करण्यात येत आहे.











