शहर पोलिस दलात मोठी कारवाई करत दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. लाच घेताना रंगेहात पकडल्या गेलेल्या या कारवाईमुळे पुणे पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक वैशाली मुरलीधर तोटेवार आणि पोलिस उपनिरीक्षक मनोज मधुकर बरुरे यांचा समावेश आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सलग दोन दिवस कारवाई करत दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी लाच स्वीकारताना पकडले होते.
वैशाली तोटेवार यांना १ मे रोजी पदोन्नतीवर मुंबई लोहमार्ग पोलिस ठाण्यात रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले होते. मात्र, त्यांनी खासगी व्यक्तीमार्फत कोंडऱ्याड हॉटेल परिसरात तब्बल २७ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी त्यांना निलंबित केले.
तर दुसरीकडे, लोहगाव पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या एका प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक मनोज बरुरे यांनी ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली.
कर्तव्य बजावताना गंभीर भ्रष्टाचार आणि गैरवर्तन केल्यामुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलिन होत असल्याचे नमूद करत अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी बरुरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
सलग दोन दिवसांत दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडून एकाच दिवशी निलंबित करण्याची ही पहिलीच घटना असल्याने पुणे पोलिस दलात खळबळ माजली आहे.











