मोबाइलवरील चॅटींगचा जाब विचारणाऱ्या पत्नीसह मुलाला पतीने बॅटने मारहाण केल्याची घटना 30 एप्रिलला कोरेगाव पार्कमधील क्वीन्स गार्डनमध्ये घडली आहे. त्यानंतर त्याने पत्नीचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न केला.
संबंधित आरोपी इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांचा ओएसडी (विशेष कार्यकारी अधिकारी )आहे. विजय धुळचंद कारंडे (वय 40, रा. क्वीन्स गार्डन, पुणे स्टेशनजवळ) याच्याविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मारहाणीत रुपाली कारंडे (वय 30) आणि मुलगा कृष्णा जखमी झाले आहेत. याबाबत पत्नी रूपालीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय कारंडे हा नांदेडमध्ये सामाजिक न्याय विभागात कार्यरत असून, सध्या प्रतिनियुक्तीवर मंत्री अतुल सावे यांच्याकडे ओएसडी म्हणून कार्यरत आहे. 30 एप्रिलला रात्री साडेआठच्या सुमारास तो पुण्यातील क्वीन्स गार्डनमधील घरी आला होता. त्यावेळी पत्नी रूपालीने त्याला तीन महिन्यांपुर्वी मोबाइलवर झालेल्या चॅटींगची विचारणा केली. त्याचा राग आल्यामुळे विजयने तिला फोडून काढेन असे म्हणत लाकडी बॅटने मारहाण सुरू केली. पत्नीच्या पाठीवर, मांडीवर, नडग्यांवर मारून तिला जखमी केले. मोबाइलचा पासवर्ड मागितला तर तुला जीवे मारेल, अशी धमकी दिली. त्यानंतरही त्याने पत्नी रूपालीचा गळा दाबून नाक दाबले. यावेळी मुलगा कृष्णा भांडण सोडवण्यासाठी मध्ये आला असता, आरोपीने त्यालाही बॅटने मारहाण केली.
मारहाणीला विरोध करीत रूपालीने विजयला बाजूला ढकलून मुलगा कृष्णाला सोबत घेतले. घरातून पळून जाउन एसटीने प्रवास करीत तिने अहिल्यानगर गाठले. त्यानंतर रूपालीने कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. कुटुंबियांनी तिच्यासह मुलावर रुग्णालयात उपचार केले. याप्रकरणी नुकतीच तिने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपासाला गती दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे या प्रकरणाचा तपास करत आहेत.











