रोहन कृतिका सोसायटी , सिंहगड रोड , मध्ये दिनांक 1 मे 2026 , वार – शुक्रवार रोजी माजी महापौर शांतीलाल सुरतवाला आणि माजी सरपंच बारकूशेठ भाईक यांच्या स्मरणार्थ श्री चंदन सुरतवाला आणि संजय भाईक यांच्या मार्गदर्शनाखालीरक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन डॉ. राहुल कुलकर्णी , श्री सचिन इटकर , डॉ.अमित वाळिंबे , डॉ दीप्ती कुलकर्णी यांनी रक्तदान करुन केले .
या शुभ प्रसंगी एकूण 96 रक्तदात्यांनी रक्तदान केले . सध्या पुणे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अनेक रुग्णांना रक्तासाठी धावपळ करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर हे रक्तदान शिबिर घेऊन अनेक रुग्णांच्या जीवन जगण्याच्या संघर्षाला बळ मिळणार आहे . म्हणूनच रक्तदान हे एक पवित्र दान आहे आणि खऱ्या अर्थाने हा एक कृतज्ञतेचा सोहळा आहे. तसेच समाज आणि देश यांच्यासाठी रक्तदानाच्या रूपात दिलेले योगदान हे सर्वश्रेष्ठ आहे . अशा भावना उपस्थितांपैकी अनेकांनी व्यक्त केल्या.
अशा समाज उपयोगी उपक्रमांमध्ये रोहन कृतिका सोसायटीतील रहिवासी नेहमीच उस्फूर्तपणे सहभागी होतात.
रोहन कृतिका सोसायटी मध्ये सातव्या वर्षी चंदन सुरतवाला यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. आजच्या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक महिला आणि तरुणांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सोसायटीचे चेअरमन श्री चेतन गोलांडे, सेक्रेटरी श्री योगेश कुलकर्णी , श्री रवींद्र डोमाळे, श्री अमित राठी , पद्मजा माणगावकर , उत्तरा गोखले यांचे विशेष सहकार्य लाभले.
आपल्या सोसायटीतील तसेच नात्यातील स्वर्गवासी झालेल्या मान्यवरांना रक्तदाना सारख्या पवित्र उपक्रमाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्याचा आगळावेगळा आदर्श रोहन कृतिका सोसायटीने समाजासमोर ठेवला आहे. तसेच प्रत्येक सोसायटीने अशा प्रकारचा उपक्रम घेऊन या उदात्त सामाजिक कार्यास हातभार लावावा असे श्री चंदन सुरतवाला म्हणाले.
या पवित्र उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे संजय भाईक यांनी कार्यक्रमात आभार मानले.











