पुण्यातील धायरी येथे एका सासर्याने आपल्या ३१ वर्षीय सुनेची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने सुनेचे डोके भिंतीवर आपटून आणि दगडाने मारहाण करत तिला जागीच ठार केले.
हत्या केल्यानंतर आरोपी घराला कुलूप लावून फरार झाला. या घटनेने पुणे शहर हादरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना धायरीतील रायकर मळा परिसरात शनिवारी घडली. स्वाती तेजस चौधरी (वय ३१) असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी भानुदास भास्कर चौधरी (वय ५७) हा स्वातीचा सासरा आहे. स्वातीचा पती तेजस चौधरी शिवाजीनगर कोर्टात क्लार्क म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी सकाळी तेजस नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. घरात स्वाती, तिचे केवळ सहा महिन्यांचे बाळ आणि सासरा भानुदास हे तिघे होते.
स्वाती आणि तिच्या सासर्यामध्ये दीर्घकाळापासून कौटुंबिक कारणांवरून वाद सुरू होते. शनिवारीही याच मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. स्वाती कपडे धुण्यासाठी बाथरूममध्ये गेली असताना भानुदास तिच्या मागे गेला. त्याने तिचे डोके भिंतीवर जोरात आपटले आणि नंतर दगडाने तिच्या डोक्यात मारहाण केली. या हल्ल्यात स्वाती गंभीर जखमी झाली आणि जास्त रक्तस्रावामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
सुनेची हत्या केल्यानंतर भानुदास चौधरीने घराला कुलूप लावले आणि पळ काढला. स्वातीचा फोन उचलले जात नसल्याने तेजस यांच्या बहिणीने त्यांना फोन करून माहिती दिली. तेजस यांनी शेजारी राहणाऱ्या एका महिलेला फोन करून घराची चौकशी करण्यास सांगितले. घर उघडल्यावर स्वाती बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली, तर त्यांचे सहा महिन्यांचे बाळ घरातच होते.
शेजार्यांनी तात्काळ तेजस आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्वातीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.नांदेड सिटी पोलिस ठाण्यात भानुदास भास्कर चौधरीविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.











