May 14, 2026 11:56 pm

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; पुष्टिपती विनायक अवतार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे : उन्हाच्या काहिलीपासून भक्तांचे रक्षण व्हावे आणि दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतकऱ्यांच्या समस्या दूर व्हाव्या, असे मागणे मागत दगडूशेठ गणपती बाप्पांना शहाळे महोत्सवात ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ पुष्टिपती विनायक हा अवतार झाला. त्यानिमित्ताने मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्यावेळी गणेश जन्माची पूजा व अभिषेक झाला. तसेच पं. रघुनंदन पणशीकर यांनी गायनसेवा अर्पण केली. मंदिरामध्ये गणेशयाग देखील करण्यात आला.

श्री गणेशांचे विविध लीला स्वरुपात अनेक अवतार पाताळ, पृथ्वी व स्वर्गलोकात झाल्याचे आपल्या पुराणात सापडते. त्यापैकी एक म्हणजे पुष्टिपती विनायक अवतार. दुर्मति राक्षसाने पृथ्वी-पाताळ-स्वर्गलोक जिंकून सर्वत्र विध्वंस चालविलेला होता. त्याचा नित्पात करण्याकरिता पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेशांनी विनायक अवतारामध्ये प्रकट होऊन दुर्मती राक्षसाचा वध केला त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टिपती विनायक जयंती म्हणून साजरा केला जातो.

त्यामुळे गाभाऱ्यासह सभामंडपात शहाळ्यांची व वृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती. श्रीगणेश पुराण व मुद्गल पुराण या ग्रंथामध्ये या अवताराचा संदर्भ आढळतो. या अवतारामध्ये पुष्टी ही भगवान विष्णुंच्या घरी त्याची मुलगी म्हणून जन्म घेते व श्री गणेश हे विनायक स्वरुपात शंकर-पार्वती यांच्या घरी जन्म घेतात.

भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो. वैशाख वणव्यापासून देशवासियांचे रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सद्भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी अर्पण करण्यात येतो. तसेच, दुस-या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे, असेही ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

 

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!