पुणे शहर हे भारतातील सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. जगभरातून हजारोच्या संख्येने पर्यटक पुण्यात फिरण्यासाठी येतात. पुण्यात टुरिस्ट व्हीजावर फिरायला आलेल्या 3 अमेरिकन नागरिकांना तडकाफडकी देश सोडण्याचे आदेश देण्यात आले.
या प्रताप पाहून पोलिसही संतापले आहेत. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे या पर्यटकांची पोल खोल झाली.
टुरिस्ट व्हीजावर भारतात आलेल्या तीन अमेरिकन नागरिकांकडून ख्रिश्चन धर्माचा प्रचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या 3 अमेरिकन नागरिकांना 10 मेपूर्वी देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित तिघे काही दिवसांपूर्वी भारतात येऊन पिंपरी-चिंचवडमधील एका हॉटेलमध्ये 26 एप्रिल रोजी मुक्कामाला होते. त्यानंतर 27 एप्रिलला ते पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरात गेले.
यावेळी त्यांच्या जवळ मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत छापलेली धार्मिक पत्रके आढळली. त्यांनी एका वाहनचालकाला पत्रक देत ख्रिश्चन धर्म इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. संशय आल्याने संबंधित चालकाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ तिघांना ताब्यात घेऊन विशेष शाखेत चौकशी केली.
चौकशीत त्यांनी धर्मप्रसाराचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. टुरिस्ट व्हीजावर अशा प्रकारच्या कृतींना कायद्याने मनाई असल्याने ही कारवाई करण्यात आली. तसेच, हे तिघे यापूर्वीही विविध व्हीजावर भारतात येत असल्याचे त्यांच्या पासपोर्ट तपासणीतून स्पष्ट झाले आहे.











