May 15, 2026 12:38 am

भोंदू खरात प्रकरणानंतर राज्यभर कारवाईचा धडाका; महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर अवघ्या एका महिन्यात पोलिसांनी राज्यभर १५ भोंदू बाबांच्या विरोधात  गुन्हे दाखल करत त्यांच्या दरबारांवर कारवाईचा धडाका लावला आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी ही माहिती दिली. यात महिलांचे लैंगिक शोषण तसेच आर्थिक फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर आल्याने पुरोगामी महाराष्ट्रात भोंदूगिरीचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे.

संजय बनसोडे म्हणाले, “अंधश्रद्धेमुळे होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंनिसच्या १८ वर्षांच्या सातत्यपूर्ण संघर्षानंतर २०१३ मध्ये ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ अस्तित्वात आला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असले, तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात शासन अपयशी ठरल्याची टीका अंनिसने केली आहे.

मात्र, समितीच्या प्रबोधन आणि पाठपुराव्यामुळे विविध ठिकाणी गुन्हे नोंदवले जात आहेत. नाशिक येथील अशोक खरात प्रकरणानंतर पीडित महिलांमध्ये पुढे येऊन लढण्याची हिंमत निर्माण झाली असून, काही ठिकाणी उत्स्फूर्तपणे तर काही ठिकाणी अंनिसच्या प्रयत्नातून गुन्हे दाखल झाले आहेत. ग्रामीण भागासह शहरी भागातही महिलांबरोबर पुरुषांचीही फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.”

अनेक पीडित सामाजिक प्रतिष्ठा व भीतीपोटी समोर येण्यास घाबरत आहेत. अशा पीडितांनी निर्भयपणे तक्रार करावी, तसेच काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी स्वतःहून (सुमोटो) गुन्हे दाखल करावेत, असे आवाहन राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह ॲड. रंजना गवांदे आणि सहकार्यवाह विष्णू लोणारे यांनी केले आहे.

एका महिन्यात कारवाई झालेल्या भोंदूंची नावे

अशोक कुमार खरात (नाशिक), राजेंद्र गडगे उर्फ गडगेबाबा (संगमनेर, अहिल्यानगर), चेतन सुनील माळी (मूर्तिजापूर, अकोला), पंकज देवराम घोलप (येडगाव, पुणे), मनोहर मामा भोसले (कुरुडवाडी, सोलापूर), नाना बर्डे (आळे फाटा, पुणे), ऋषिकेश वैद्य (वसई, मुंबई), अल्ताफ रईस खान (मालाड, मुंबई), रिधम पांचाळ (मालाड, मुंबई), गणेश शिंदे (श्रीरामपूर, अहिल्यानगर), अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा (नवी मुंबई), विठोबा वाल्मीक जाट (सातपूर, नाशिक), किसन तळपे (मंदोशी, खेड), महेशगिरी उर्फ महेश काकडे (निफाड, नाशिक), अब्दुल राशीद शेख (खालापूर, रायगड).

 

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!