पुण्यातल्या बाणेर परिसरात एकदम फिल्मी वाटावा असा प्रकार घडलाय. घरात कामाला असलेली मोलकरीण आणि घरमालकिणीमध्ये झालेल्या एका छोट्याशा संशयाने तब्बल साडेचौदा लाखांचे दागिने आणि महागडी साडी चोरीचा पर्दाफाश केला आहे.
हा सर्व प्रकार सुरू झाला एका साडीपासून, घरातली 20 हजार रुपये किंमतीची सिल्क साडी अचानक गायब झाली. घरमालकिणीला आधी वाटलं की कुठेतरी ठेवली असेल, पण काही दिवसांनी तीच साडी मोलकरणीने नेसून थेट व्हॉट्सॲप स्टेटसवर टाकली, आणि इथेच मालकिणीला संशय आला आणि इथे मोलकरणीचा डाव फसला.
घरमालकिणीने स्टेटस पाहिलं आणि डोक्यात लगेच ट्यूब पेटली. ‘अरे ही साडी तर माझीच आहे!’ असा विचार येताच तिने मोलकरणीला जाब विचारला. पण तिकडून सरळ उत्तर न देता उडवाउडवीची बोलणी सुरू झाली. इथंच घरमालकिणीला पूर्ण संशय आला आणि तिने लगेच तिला कामावरून काढून टाकलं. पण गोष्ट इथेच थांबली नाही. काही दिवसांनी घरात तपास करताना अजूनच धक्कादायक गोष्टी समोर आल्या. किचनच्या ओट्याखाली पाण्याची बाटली, तेल आणि काही इतर वस्तू सापडल्या. घरमालकिणीने दावा केला की या वस्तू तिथे मुद्दाम ठेवलेल्या असून त्यामागे काळी जादू करण्याचा हेतू आहे.
आता घरमालकिणीचा संशय अजूनच बळावला. तिने थेट बाणेर पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनीही प्रकरण गंभीर घेतलं असून तपास सुरू केला आहे. मोलकरणीने नेमकं किती आणि काय-काय घेतलं, हे शोधण्याचं काम आता पोलिसांच्या हातात आहे. बाणेर परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘स्टेटसनेच चोर पकडला’, अशी भन्नाट कमेंट लोक करत आहेत. घरकाम करणाऱ्यांवर विश्वास ठेवताना थोडी काळजी घ्यावी लागते, हे पुन्हा एकदा या घटनेनं दाखवून दिलं आहे.
.











