केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंचपद रिक्त झाले होते. या सरपंचपदासाठी नुकतीच निवडणूक पार पडली. यात धक्कादायक निकाल लागला असून संतोष देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला आहे.त्यांचा स्वरूपानंद देशमुख यांनी पराभव केला आहे. त्यांनी अश्विनी देशमुख यांचा ९२ मतांनी पराभव केला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या मस्साजोगच्या सरपंचपदाच्या निवडणुकीकडे अख्ख्या राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या रिंगणात होत्या. तर त्यांच्याविरूद्ध स्वरूपानंद देशमुख उभे होते.
पहिल्यापासूनची ही लढत रंजक आणि अटीतटीची झाली होती. अखेर या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांचा अवघ्या ९२ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत संतोष देशमुख यांनी स्वरूपानंद देशमुख यांचा अवघ्या ९ मतांनी पराभव केला होता.
यंदाच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत संतोष देशमुखांची मुलगी वैभवी आणि मुलगा विराज देशमुखने आपल्या आईसाठी प्रचार केला. त्यावेळी गावकरी भावुक झाले अन् त्यांच्या डोळ्यातून अश्रू आल्याचं दिसून आलं.
सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची अपेक्षा होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाच उमेदवारांपैकी संजिवनी देशमुख, पंजाब देशमुख आणि करुणा देशमुख या तीन उमेदवारांनीच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर स्वरूपानंद देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवल्यामुळे ही निवडणूक झाली होती.











