May 15, 2026 9:09 am

बंद मीटरमुळे ‘मोफत टँकर’ वितरणात पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे : एरंडवणे परिसरातील पटवर्धन बाग येथील टँकर पॉईंटवर मोठा गैरप्रकार उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. येथे बसविण्यात आलेला पाणी मीटर 16 डिसेंबर 2025 पासून बंद अवस्थेत असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर मनपाकडून पुरविण्यात येणाऱ्या ‘मोफत पाणी टँकर’ व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टँकर पॉईंटवरून प्रभाग क्रमांक 10, 11, 29, 30, 31, 32 आणि 33 या विस्तृत भागात पाणीपुरवठा केला जातो. मात्र, मीटरच बंद असल्यामुळे प्रत्यक्षात किती टँकर भरले गेले आणि किती पाणी वितरित झाले याचा अचूक हिशोब ठेवणे अशक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वीही अशाच प्रकारचा प्रकार समोर आला होता. एका गुप्त पाहणीत रजिस्टरमध्ये 18 टँकरची नोंद असताना प्रत्यक्षात तब्बल 50 टँकर भरले गेल्याचे उघड झाले होते. त्यानंतर सर्व टँकर पॉईंटवर मीटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता पुन्हा त्याच प्रकाराला खतपाणी मिळत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच, टँकर वितरणाच्या रजिस्टरमध्ये किंवा चलनावर संबंधित सोसायटी अथवा वस्तीतल्या नागरिकांची कोणतीही सही नसल्याची गंभीर त्रुटीही समोर आली आहे. यामुळे प्रत्यक्षात पाणी पोहोचले की नाही, याची खात्री करण्यास अडचण निर्माण होत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर, मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे खर्डेकर यांनी तातडीने चौकशी करून खुलासा करण्याची मागणी केली आहे. शहरातील सर्व टँकर पॉईंटची तपासणी करून मीटर कार्यरत आहेत का याची खात्री करावी, तसेच पाणी वितरणानंतर संबंधित लाभार्थ्यांची सही घेणे बंधनकारक करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, मोफत टँकर कोणत्या कारणावरून आणि कोणाच्या निर्देशानुसार पाठविण्यात आले याची नोंद ठेवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. भविष्यात पुण्यात 24×7 पाणीपुरवठा योजना सुरू होणार असल्याने लाखो मीटरची देखभाल कशी केली जाणार, याबाबतही त्यांनी शंका उपस्थित केली आहे.

एकूणच, बंद मीटर आणि अपूर्ण नोंदीमुळे मोफत पाणी टँकर व्यवस्थेत मोठा ‘झोल’ असल्याची शक्यता असून, याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!