April 27, 2026 3:51 pm

मुंबई दर्शन करून परतताना काळाचा घाला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे-बंगळूर महामार्गावर घुणकी फाट्याजवळ महामार्गाच्या बाजूला थांबलेल्या मिनीबसला आराम बसने पाठीमागून जोरात धडक दिल्याने दोन बसमध्ये चिरडून मिनीबसचालक जागीच ठार झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले.

लोकेश तिमय्या (वय २४, रा. बिलीकेरे, ता. हुणसूर, जि. म्हैसूर, कर्नाटक) असे मृत चालकाचे नाव आहे. हा अपघात काल पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास झाला. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील मेलुकोटे येथील पर्यटक मिनीबस (क्र. डीडी ०१ एई ९२१४) घेऊन सहलीसाठी महाराष्ट्रात आले होते. मुंबई दर्शन करून ते परत आपल्या गावी निघाले होते.

पहाटे साडेतीनच्या सुमारास ही बस घुणकी गावच्या हद्दीत आली असता मिनीबस थांबवून चालक लोकेश तिमय्या लघुशंकेसाठी मिनीबसच्या मागील बाजूस गेला. याचवेळी पुण्याहून कोल्हापूरकडे भरधाव निघालेल्या आराम बस (एमएच ४३ सीके ०६६६) ने थांबलेल्या मिनीबसला पाठीमागून जोरात धडक दिली.

या धडकेत मिनीबसच्या मागे उभा असलेला चालक लोकेश हा बसच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. अपघातात मिनीबसचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही वाहनांतील कुमार (वय ४५), महेश (वय ४७), कीर्तन (वय २०) यांच्यासह काही प्रवासी जखमी झाले.

अपघातानंतर आराम बस चालक घटनास्थळावरून पसार झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघातात ठार झालेल्या चालकाचा मृतदेह मिनीबसखाली अडकला होता. त्याची सुटका करण्यासाठी कोल्हापूर अग्निशमन दल व पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुदर्शन खराटे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. अपघाताची माहिती मिळताच कर्नाटकातील पांडवपुरा मेलुकोटे मतदारसंघाचे आमदार दर्शन पुटण्णाय्या यांनी निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्याशी संपर्क साधून मदतकार्य राबविले. त्यांच्या सहकार्याने प्रवाशांच्या निवास व परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संदीप घाटगे व प्रसाद खैरमोडे करीत आहेत.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!