सध्याच्या काळात लग्नासाठी मुलीच मिळत नसल्याने फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. मराठवाड्यात लुटेरी दुल्हन गँग सक्रिय झाल्याचे चित्र आहे. लग्नानंतर सुरुवातीचे दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येत असतात.
मात्र, मंगळवेढ्यातील एका तरुणाची लग्नाची हौस-मौज अवघे काही तासच टिकली. कारण लग्नाच्या चौथ्या दिवशी नवरी नवऱ्याला लुटून पळण्याच्या प्रयत्नात होती. मात्र तरुणाच्या प्रसंगवधानाने मोठा बनाव उघड झाला आहे. तरुणाशी लग्न करून त्याचे पैसे घेणाऱ्या ‘लुटेरी दुल्हन गँग’ला पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीनंतर पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवेढा तालुक्यातील एका शेतकरी तरुणाचे लवकर लग्न जमत नव्हते म्हणून तो नवरीच्या शोधात होता. यावेळी एजंटने तरुणाला हेरले आणि उदगीर येथे एक मुलगी असून तिला पाहायला तिथे ये असं म्हणाला. यानंतर त्या एजंटने त्या व्यक्तीला मुलगी दाखवली. मुलगी पसंत पडल्यावर लग्नाचे ठरले. लातूर जवळील उदगीर येथील एका सुरेखा सूर्यवंशी या एजंटने दोन लाख 70 हजार रुपये घेऊन तरुणाचे लग्न लावले.
लग्नानंतर पहाटे या नवरदेवाच्या घराजवळ एक चार चाकी गाडी येऊन थांबली. पहाटे सहा वाजता कोणालाही सांगता ही नवरी त्या गाडीत जाऊन बसली आणि गाडी निघूनही गेली. मात्र ही घटना शेजाऱ्याने पाहिल्यानंतर तातडीने या नवरदेवाला याची कल्पना दिली. त्यानंतर या गाडीचा पाठलाग करत गाडी थांबवण्यात आली. आपण फसलो गेलेलो आहे याची जाणीव झाल्यावर नवरदेवाने गाडीसह थेट पोलीस स्टेशन गाठले. यावेळी गाडीतील मुलीची आई, मुलीची बहीण आणि भाऊ अशा सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
लग्न लावण्यापूर्वी नववधू असणारी मुलगी मराठा समाजाची आहे असेही सांगितले. लग्न झाले. मात्र लग्न झाल्यानंतर अवघ्या चार दिवसात या मुलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी नवी नवरी पूर्वीच विवाहित असल्याचे उघडकीस आले. तिला मुलेही आहेत. महत्त्वाचे म्हणजे मराठा समाजाची नववधू आहे असे भासवलेले ही नवरी मुस्लिम धर्मीय असल्याची माहिती पुढे आली. याबाबत नवऱ्याने पाठलाग करून नवरीला पकडले. आणि यानंतर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या मुलाची फसवणूक केलेली नवरी आणि एजंट मंगळवेढा पोलिसांच्या ताब्यात आहेत. वय झाल्याने ज्यांचे लग्न जमत नाही, अशा मुलांना गाठायचे… त्यांच्याशी लग्न करायचे आणि दागिने, रोख रक्कम व किमती वस्तू घेऊन पोबारा करायचा.. अशा ‘डॉली की डोली’ या टोळी सध्या सक्रिय आहे.











