घाटकोपरच्या नित्यानंद नगर परिसरात शनिवारी रात्री एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक घटना घडली. दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या एका नराधमाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच संतप्त जमावाने हल्ला चढवला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे .
या हल्ल्यात एका पोलीस शिपायाला गंभीर दुखापत झाली असून, पोलिसांनी याप्रकरणी ३० ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नित्यानंद नगरमधील हजीमुल्ला चाळ परिसरात एका नराधमाने दोन चिमुरड्यांवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी त्या नराधमाला पकडून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावाचा रुद्रावतार पाहून तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एका घरात लपून बसला. जमावाकडून मारहाण होत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर घटनास्थळी घाटकोपर पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले.
यावेळी पोलिसांनी जमावाला दूर सारत आरोपीला घरातून बाहेर काढले. मात्र, संतापलेला जमाव पुन्हा एकदा आरोपीवर धावून आला. पोलिसांनी त्याला पोलीस गाडीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान गर्दीतील काही जणांनी थेट पोलिसांवरच हात उचलला. एका व्यक्तीने पोलीस शिपाई कोळी यांच्या डोक्यात हेल्मेटने जोरात प्रहार केला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
जमावाच्या हल्ल्यातून कशीबशी सुटका करून घेत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गाठले. कायदा हातात घेणाऱ्या आणि ऑन-ड्यूटी पोलिसांना मारहाण करणाऱ्या ३० ते ४० अज्ञात लोकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मारहाण करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे घाटकोपर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.











