पुणे : ‘नारी शक्ती’चा गजर करणाऱ्या पुण्यातील भाजपाचे धीरज रामचंद्र घाटे यांनी पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात, शिवाजीनगर या ठिकाणी, सर्व जनसमुदायासमोर व सर्व लाईव्ह मीडियासमोर सार्वजनिकरित्या स्वारगेट येथे भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ६४(१), ६९, ७५(२) अंतर्गत दाखल असलेल्या गु.र.न. ९१/२०२६ मधील पीडितेचे नाव घेऊन गंभीर स्वरूपाचा अपराध केला आहे.
कोणत्याही पीडित महिलेचे नाव घेण्यास कायद्याने प्रतिबंध असतानाही आरोपीने सार्वजनिकपणे तिचे नाव घेऊन तिचे चिरहरण केले आहे. तसेच एवढ्यावर न थांबता सदर आरोपीने स्वतःचा प्रचार व प्रसार करण्यासाठी व स्वतःचे नाव करण्यासाठी त्या पीडितेचे नाव घेऊन त्याचे चित्रीकरण (व्हिडिओ/रेकॉर्डिंग) करून आपल्या समाजमाध्यमांद्वारे (सोशल मीडिया) फेसबुक व इतर ठिकाणी प्रसारित केले आहे.
या पार्श्वभूमीवर स्वाती गायकवाड यांनी ॲड. तोसिफ शेख यांच्या मार्फत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ७२ अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पुणे कमिशनर कार्यालयाविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.











