पवनी तालुक्यातील अड्याळ या गावालगत लग्नाचे वऱ्हाड घेऊन परताणाऱ्या व्हॅनला भीषण अपघात झाला. यात पाच जण ठार तर, चार जण जखमी झाले. ही घटना अगदी अड्याळ गावालगतच्या महामार्गावर गुरूवारी (२३ एप्रिल) रात्री ९:४५ वाजताच्या दरम्यान घडली.व्हॅनचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. घटनास्थळावरील चित्र अत्यंत विदारक होते.
मृतांमध्ये श्वेता पुरूषोत्तम नगरे (१७), प्रभाकर चाचरकर व त्यांची पत्नी मुन्नी प्रभाकर चाचरकर, नयना देवराम नगरे, दुर्गा देवराम नगरे या पाच जणांचा समावेश आहे. तर, जखमींमध्ये चालक सोहम जागेश्वर गेडाम (२५, पिंपळगाव) आणि नवरदेवाचा मित्र उमेश बोधनकर व अन्य दोघांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, अड्याळ येथील बसस्टँड परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील मुलाचे लग्न गुरूवारी अड्याळपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील कोंढा येथील एका चर्चमध्ये होते. बुधवारी अड्याळमध्ये आनंदात हळदीचा कार्यक्रम झाला. सकाळी कोंढा येथे लग्न आटोपल्यावर रात्री वऱ्हाडी एका व्हॅनने अड्याळला निघाले. वऱ्हाड्यांची पहिली खेप पोहचवून दुसरी खेप आणत असतानाच अगदी गावालगतच्या सहाय्यतानगर परिसराजवळच हा अपघात घडला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅनचा टायर फुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन पुढे असलेल्या एका मोठ्या १० चाकी ट्रकवर आदळले. त्यामुळे हा भीषण अपघात घडला. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.










