जिममध्ये शरीराचे कमालीचे पिळदार प्रदर्शन करण्याच्या नादात तरुण आपल्या जिवाशी खेळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अतिव्यायामामुळे मेंदूतील रक्तवाहिनी फाटून (आर्टरी डिसेक्शन) अर्धांगवायूचा झटका आलेल्या एका २३ वर्षीय तरुणाला नागपुरातील डॉक्टरांनी ‘गोल्डन अवर’मध्ये शस्त्रक्रिया करून मृत्यूच्या दाढेतून परत आणले आहे.
१० एप्रिल रोजी ओम भोयर हा २३ वर्षांचा तरुण जिममध्ये अनेक तास व्यायाम करून घरी परतला. मात्र, काही वेळातच तो अचानक बेशुद्ध पडला. सुदैवाने त्याची आई आरती भोयर या स्वतः नर्स असल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून हा पॅरालिसीसचा अटॅक असल्याचे ओळखले आणि तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधला.
न्युरोव्हॅस्क्युलर स्पेशालिस्ट डॉ. सचिन ढोमणे यांनी तपासणी केली, ‘एमआरआय’च्या अहवालात ओमच्या मेंदूतील रक्तवाहिनी फाटून गंभीर रक्तस्राव झाल्याचे आणि रक्ताची गुठळी साचल्याचे निदान झाले. परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने रुग्णाला तातडीने क्रीसेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉ. ढोमणे यांनी ‘इंडोव्हॅस्कूलर सर्जरी’ करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी’ या आधुनिक तंत्राचा वापर केला. यामध्ये रुग्णाच्या पायात एक छोटेसे छिद्र करून कॅथेटरच्या साहाय्याने डॉक्टर थेट मेंदूच्या रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचले. तेथे अडकलेली रक्ताची गुठळी ‘न्युरो स्टेंट’च्या मदतीने अत्यंत कौशल्याने बाहेर काढली. यामुळे मेंदूचा रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत झाला आणि ओमचा अर्धांगवायू बरा होण्यास सुरुवात झाली.
शस्त्रक्रियेवेळी ओमची प्रकृती इतकी खालावली होती की त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले होते. मात्र, १० दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर, २१ एप्रिल रोजी ओम स्वतःच्या पायावर चालत हॉस्पिटलमधून घरी गेला. स्ट्रेचरवर आलेल्या तरुणाने चालत घरी जाणे, हे सर्वात मोठे समाधान असल्याचे डॉ. ढोमणे यांनी सांगितले.
अशा रुग्णांसाठी पहिले ६ तास हे ‘गोल्डन अवर’ असतात. जितक्या लवकर ‘मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी’ होईल, तितक्या लवकर रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता वाढते. ओमच्या बाबतीत वेळेत घेतलेला निर्णय महत्त्वाचा ठरला. काही रुग्णांमध्ये २४ तासांपर्यंत ही शस्त्रक्रिया करता येते, असेही डॉ. ढोमणे म्हणाले.
हॉस्पिटलचे संचालक डॉ. अजीज खान यांनी तरुणांना मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, जिम नेहमी ‘सर्टिफाइड’ जिम प्रशिक्षकाच्या देखरेखीखालीच करायला हवे. व्यायाम सुरू करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांकडून आपली शारीरिक तपासणी करून घ्यायला हवी. स्वतःच्या शरीराची क्षमता ओळखूनच व्यायाम करायला हवे. अन्यथा अतिउत्साह जिवावर बेतू शकतो.











