‘सावरखेड- एक गाव’ चित्रपट आठवतोय का? एक गाव, गावातील राजकारण आणि त्या गावात घडणाऱ्या अनेक घडामोडी, रात्रीच्या वेळी घडणाऱ्या अप्रिय घटना यावर भाष्य करणाऱ्या कथानकामुळं हा चित्रपट प्रचंड चर्चेत आला होता.
अशा या चित्रपटाप्रमाणंच एक विचित्र घटना सध्या नाशिकमध्ये घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. नागरिकांमध्ये या सर्व घडामोडींमुळं भीतीचं वातावरण असून, इथं नेमकं काय घडतंय याची चर्चा राज्यातही होण्यास सुरुवात झाली आहे. या व्हिडीओमागचं नेमकं सत्य काय आणि नाशिकमध्ये घडतंय काय जाणून घ्या…
काही दिवसांपासून व्हायरल होणारा व्हिडीओ तुम्ही पाहिला?
सोशल मीडियावर नाशिकच्या बागलाण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गावात भूत आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला, शेअर करण्यात आला. ज्यामुळं गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण पसरल्याचं दिसून आलं. बागलाणच्या आराई गावात भूत असल्याचा मेसेजही व्हायरल झाला. या मेसेजमुळं बागलाणमध्ये भितीचं वातावरण पसरलं. गावाच्या हद्दीत, मोकळ्या जागा, निर्मनुष्य भागात हे भूत दिसत असल्याचा संदेश सध्या फिरत आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली.
विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व्हायरल करण्यात आलेले फोटो जुने आणि काही ‘एआय’च्या माध्यमातून कोणी तरी पसरवल्याचं म्हटलं गेलं. यानंतर आराई गावात उडालेल्या खळबळीमुळं पोलीस प्रशासनासह गावातील तरुणांनी रात्रीच्या वेळी गस्त घातल्या. मात्र कुठेही भूत असल्याचं आढळून आलं नाही. गावात ग्रामसभा घेत अशा अफवा पसरविण्यावर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.एकुणच आमच्या पडताळणीत बागलाणमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात ये असलेला फोटो आणि व्हिडीओ खोटे असून त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर, पोलीस प्रशासनानंही जनतेला सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून, तो भुताचा फोटो कोणी व्हायरल केला, कोणत्या ग्रुपवर शेअर करण्यात आला याचा शोध पोलिसांनी घेतला का ? अख्ख्या गावाला भीतीच्या वातावरणात जगायला भाग पाडणाऱ्या सदर संशयितावर अद्याप गुन्हा दाखल का नाही? असे प्रश्न उपस्थित करत संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.











