पळसदेव – मराडेवाडी (ता. इंदापूर) येथील केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवान महादेव दादा नाझीरकर (वय ३४) यांचा रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. पुणे- सोलापूर महामार्गावर लोणी देवकर येथील तोंडेवस्तीजवळ घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबाचा आधार आणि देशाचा एक रक्षक गमावल्याने ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महादेव नाझीरकर हे केंद्रीय राखीव पोलिस दलात कार्यरत असल्याने ते मुंबईत वास्तव्यास होते. ते सुटीला आपल्या गावी मराडेवाडी येथे रविवारी रात्री ११ वाजता आले होते. त्यांचे वडील त्यांना घेण्यासाठी आलेले असता यावेळी रस्ता ओलांडून जाताना वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
आज दुपारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या हातांनी देशाचा तिरंगा अभिमानाने धरला, त्याच हातांना आज अखेरचा निरोप देण्याची वेळ आली, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यांच्या पश्चात वृद्ध आईवडील, पत्नी आणि मुले असा परिवार आहे. या अपघातानंतर अज्ञात वाहनाचा पोलिस शोध घेत आहेत. एका जवानाचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
बापाच्या डोळ्यांदेखत काळाची लेकावर झडप
मुलगा सुट्टीवर आल्याने वडील दादा लक्ष्मण नाझीरकर (वय ५८) हे रात्री त्यांना घेण्यासाठी आलेले होते. मात्र, ज्या पित्याने महादेवला बोट धरून चालायला शिकवलं, त्याच वडिलांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या काळजाचा तुकडा काळाच्या पडद्याआड गेला. अपघात झाला तेव्हा महादेवचे वडील रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभे होते.
आपल्या लेकाचं येणं ते डोळे भरून पाहत होते, पण पुढच्याच क्षणी एका अज्ञात वाहनाने महादेवला चिरडले. ज्या हातांनी देशाचा तिरंगा उंचावला, तो देह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. या धक्कादायक प्रसंगामुळे पित्याला मोठा मानसिक धक्का बसला आहे.











