बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या विद्यार्थिनीचं स्कुल बसमध्ये लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. बस चालकानेच या मुलीचं लैंगिक शोषण केले असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली होती.
बदलापूरमधील ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा अशीच घटना मुंबईत घडल्याचे समोर आले आहे.
मुंबईतील मालाड येथील एका शाळेत ४ वर्षांच्या बालिकेवर शिपायाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालाडमधील एका नामांकित शाळेतील शिपायाने चार वर्षांच्या विद्यार्थिनीला धमकावत तिच्यावर अत्याचार केला. ही घटना १२ जानेवारी रोजी घडली असून पीडित विद्यार्थिनीने दोन दिवसांपूर्वीच (६ फेब्रुवारी) या घटनेबाबत तिच्या पालकांना सांगितले. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.
नेमके काय घडले?
मालंडमधील एका शाळेतील अनिल पांचाळ (वय ३०) या शिपायाने शाळेतील एका चार वर्षीय चिमुकलीला धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. या घटनेच्या काही दिवसानंतर पीडित विद्यार्थिनीने तिच्या पालकांना घडलेली सर्व घटनेबाबत माहिती दिली. याबाबत पीडितेच्या पालकांनी शाळेत जाऊन जाब विचारला असता शाळेच्या बदनामीच्या भीतीने शाळेच्या सीईओने अनंत याज्ञीक यांनी हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
मात्र पालकांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली असून मुलीचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहे. सध्या पोलिसांनी आरोपी शाळेचा शिपाई आणि शाळेचा सीईओ विरोधात बीएनएस कलम ७४, ३५१ (२) आणि पोक्सो कलम १०,१७,२१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
दरम्यान, या घटनेननंतर पोलीस शाळेतील सीसीटीव्ही फुटेज, कर्मचारी नोंदी आणि शाळा व्यवस्थापनाच्या भूमिकेची चौकशी करत आहेत. तसेच या घटनेनंतर संपूर्ण परिसरात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर पालकांमध्ये शाळेसारख्या विद्येच्या घरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.











