पोलिसांनी जप्त केलेले १ कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे अमली पदार्थ पोलीस मुख्यालयाच्या गोदामातून पळवल्याप्रकरणी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार श्यामसुंदर विश्वनाथ गुजर याच्याविरुद्ध आज, शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान गुजथ याला शासन सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
पुणे पोलिसांनी गेल्या महिन्यात शिरूरमध्ये कारवाई करत सुमारे २ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. यामध्ये अटक केलेल्या आरोपीकडून श्यामसुंदर गुजर याचे नाव पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पुणे पोलिसांनी नगरमध्ये येऊन गुजर याला अटक केली. त्यानंतर जिल्हा पोलीस दलाला गुजर याच्या कारणाम्यांची माहिती मिळाली. त्यामुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती. आता त्याच्याविरुद्ध चौकशीनंतर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्यामसुंदर गुजर हा अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुना शाखेत कार्यरत होता. त्याच्याकडे जप्त केलेल्या अंमली पदार्थाच्या गोदामाचा कार्यभार होता. या गोदामाची किल्लीही त्याच्याच ताब्यात होती. हे गोदाम पोलीस मुख्यालयात आहे. श्रीरामपूर पोलिसांनी मे २०२५ मध्ये ४०८ किलो वजनाचे १३ कोटी ७५ लाख रुपये किमतीचे अल्फ्राझोलम हा अंमली पदार्थ जप्त केला. तो पोलीस मुख्यालयातील गोदामात गोण्यांमधून भरून ठेवण्यात आला होता.
श्यामसुंदर गुजर याला पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर गुजर याने पोलीस मुख्यालयातील गोदामातून अंमली पदार्थ पळवले व त्याची विक्री केल्याचे आढळले. ही बाब उघड झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपअधीक्षक टिपरसे, गुन्हे शाखेचे निरीक्षक कबाडी व कोतवाली ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांची चौकशी समिती नेमली होती.
या चौकशी समितीने अहवाल दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्यामसुंदर गुजर याने जप्त केलेल्या साठ्यातून १० किलो ९७५ ग्रॅम अल्फ्राझोलम हा अंमली पदार्थ चोरून त्या जागी मैद्याची पोते भरल्याचे तपासात आढळले आहे. श्यामसुंदर गुजर याने डल्ला मारलेल्या अंमली पदार्थांची किंमत १ कोटी ९ लाख ७५ हजार रुपये आहे. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी अमली पदार्थाच्या गुन्हे गोणीमध्ये मैदा भरून ठेवल्याचे चौकशीत आढळले. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांनी गुजर याला शासन सेवेतून बडतर्फ केल्याचे कारवाई आज सायंकाळी केली.











