पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आडोशी येथे गॅस टँकर पलटी झाल्याने तब्बल 32 तास वाहतूक कोंडी झाली होती. या महामार्गावर आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच एवढ्या वेळ वाहतूक कोंडी झाल्याने मिसिंग लिंक प्रकल्प कधी पूर्ण होणार असा सवाल उपस्थित होत आहे.
नियोजित वेळेनुसार हा प्रकल्प डिसेंबरअखेरपर्यंत होणे अपेक्षित होते.
याच प्रकल्पाचा एक भाग असलेल्या केबल ब्रिजचे कामास तांत्रिक अडचणींमुळे उशीर झाला आहे. हे काम पूर्ण होण्यास एप्रिल महिना उजाडू शकतो. मे महिन्यात मिसिंग लिंक प्रकल्प वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली.
लोणावळा येथे द्रुतगती मार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात व पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट ही रुंदी सहा पदरी असून, या भागात १० पदरी वाहतूक येऊन मिळते. या भागामध्ये घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात.
त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन पावसाळ्यात बंद ठेवावी लागते. या पार्श्वभूमीवर मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंकचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले. या प्रकल्पामुळे बोर घाटातील ६ किमी वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग मिसिंग लिंकचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, याच प्रकल्पाचा एक भाग असलेल्या आशिया खंडातील सर्वाधिक उंच म्हणजे १३० मीटर उंचीच्या केबल ब्रिजवर स्लॅब टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत हे पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीची कोंडी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
प्रवासाचा वेळ वाचणार
या प्रकल्पातंर्गत दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधण्यात आला आहे. या बोगद्याची रुंदी २३.५ मीटर इतकी आहे. मुंबईकडून पुण्याकडे येताना याच भागात एक किलोमीटर लांबीचा एक बोगदा असून, पुण्याकडून मुंबईकडे जाताना सर्वात मोठ्या लांबीचा म्हणजे नऊ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार केला आहे.
या दोन्ही बोगद्याचे काम या पूर्वीच पूर्ण झाले आहे. तर याच प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या केबल ब्रिजची लांबी ६४५ मीटर आणि उंची २१० मीटर असणार आहे. त्यामध्ये १३० मीटर उंचीवरील पुलावर स्लॅब टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.











