April 23, 2026 4:58 pm

*25 कोटींचा अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील मुख्य आरोपी आशिष पैठणकरला बेड्या

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा एक अत्यंत संतापजनक प्रकार जालना जिल्ह्यात उघडकीस आला आहे. अंबड आणि घनसावंगी तालुक्यात झालेल्या सुमारे २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि फरार आरोपी आशिष प्रमोदकुमार पैठणकर याला आर्थिक गुन्हे शाखेने अखेर अटक केली आहे.

पैठणकर हा घनसावंगी तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून कार्यरत होता.

असा झाला ‘महाघोटाळा’ –

अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. सरकारने जाहीर केलेली मदत वाटप करत असताना, महसूल विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून मोठी खेळी खेळली. ज्यांच्या नावावर एक गुंठाही जमीन नाही, अशा शेकडो बनावट व्यक्तींची नावे लाभार्थ्यांच्या यादीत घुसडण्यात आली. या बनावट नावांच्या आधारे सरकारी तिजोरीतून आलेली कोट्यवधींची रक्कम आरोपींनी स्वतःच्या आणि परिचितांच्या खात्यावर वळवून शासनाची फसवणूक केली.

चौकशीतून फुटले भांडे –

या गैरव्यवहाराबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त होताच, तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालात २५ कोटींच्या अफरातफरीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तपासाची चक्रे फिरू लागली.

मुख्य आरोपी ५ महिन्यांपासून होता फरार –

या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष पैठणकर हा गेल्या पाच महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. अटकपूर्व जामिनासाठी त्याचे प्रयत्न सुरू असतानाच, तो जालन्यात येणार असल्याची गुप्त माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या.

आतापर्यंत ३२ जणांना अटक –

या घोटाळ्यात केवळ पैठणकरच नाही, तर मोठी साखळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. २२ तलाठी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे ५ कर्मचारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील १ कर्मचारी अशा एकूण २८ जणांविरुद्ध सुरुवातीला गुन्हा दाखल झाला होता. तपासाचा ओघ वाढत जाऊन आतापर्यंत या प्रकरणात ३२ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर अद्याप ३ आरोपी फरार आहेत. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांच्या नावावर डल्ला मारणाऱ्या इतर ‘पांढरपेशी’ गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!