मुंबईत पूर्व द्रुतगती मार्ग, पश्चिम द्रुतगती मार्ग किंवा मुक्त मार्गावरून भरधाव वेगाने वाहने चालवून नियमांची ऐशीतैशी केली जाते.महामार्ग, अंतर्गत रस्ते आणि अपघातप्रवण क्षेत्रात या वाहनांची नजर असणार आहे. या बेशिस्त चालकांसाठी आता प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कंबर कसली आहे.
आरटीओच्या ताफ्यात आता अत्याधुनिक वेगनियंत्रण रडार वाहने दाखल झाली आहेत. ही वाहने केवळ वेगावरच नियंत्रण ठेवणार नाहीत, तर अर्धा किलोमीटर अंतरावरूनच वाहनाचा नंबर टिपून काही सेकंदात थेट मालकाच्या मोबाईलवर ई-चलान धाडणार आहेत.
या वाहनातील रडार प्रणाली १०० मीटर परिसरातील वाहनांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणार आहे.
लेन बदलणे, अतिवेग आणि संशयास्पद हालचाली एकाचवेळी कॅमेऱ्यात कैद होतील. त्यामुळे आता महामार्गावर स्टंटबाजी करणाऱ्यांची खैर उरणार नाही. विशेष म्हणजे, चोरीची किंवा बेकायदा वाहने शोधणेही या प्रणालीमुळे सोपे होणार आहे.
या यंत्रणेची क्षमता इतकी आहे, की अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या वाहनाचा नंबरप्लेट हा कॅमेरा अचूकपणे टिपू शकतो. त्यामुळे लांबूनच नियम मोडणाऱ्यांची नोंद केली जाईल. आरटीओच्या ताफ्यात वेगनियंत्रण वाहने रस्ते सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी शासनाने आरटीओला हायटेक बनवले आहे. ही वेगनियंत्रण वाहने फिरते नियंत्रण कक्ष म्हणून काम करतील, ज्यामुळे महामार्गावरील गुन्हेगारी आणि नियमभंग कमी होण्यास मदत होईल.
अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’
केवळ कारवाईच नाही, तर ही वाहने अपघाताच्या वेळी ‘जीवनरक्षक’ म्हणूनही काम करतील. महामार्गावर अपघात झाल्यास ही इंटरसेप्टर वाहने तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करतील. या वाहनांमध्ये प्रथमोपचार किट आणि इतर आपत्कालीन सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
उच्च दर्जाचे कॅमेरे, अत्याधुनिक रडार यंत्रणा
या वाहनांवर ३६० डिग्री फिरणारे हाय-डेफिनिशन कॅमेरे बसवण्यात आले आहेत. लेझर खार तंत्रज्ञानामुळे दिवसाप्रमाणेच रात्रीच्या अंधारातही वाहनांचा वेग आणि नंबर स्पष्टपणे ओळखता येणार आहे.
सेकंदात ऑटोमॅटिक चलान, तासाला १००० पावत्या
ही यंत्रणा पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. नियमभंग होताच यंत्रणा आपोआप चलान तयार करते. एका तासाला तब्बल १,००० पावत्या फाडण्याची क्षमता या सॉफ्टवेअरमध्ये आहे.
वाहने थांबवण्याची गरज भासणार नाही
पूर्वी आरटीओ कर्मचारी वाहन थांबवून कारवाई करायचे, ज्यामुळे वाहतूक कोंडी व्हायची किंवा वाद व्हायचे. आता वाहन थांबवण्याची गरज नाही. पुरावा थेट फोटोसह मोबाईलवर येईल.
लेन बदल, ओव्हरस्पीडिंग व संशयास्पद कळणार
रस्त्यावरील पांढरा पट्टा ओलांडून (लेन कटिंग) धोकादायक ओव्हरटेकिंग करणाऱ्यांची माहिती ही यंत्रणा तत्काळ देईल. संशयास्पद हालचाली दिसताच सिस्टीम सतर्क करेल.
महामार्ग, अंतर्गत रस्ते आणि अपघातप्रवण क्षेत्रात ही वाहने तैनात असणार आहेत. बेशिस्त वाहतूक आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे, हा या इंटरसेप्टर वाहनांचा मुख्य उद्देश आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे पारदर्शकता येईल आणि मानवी हस्तक्षेप कमी होईल. या माध्यमातून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. वाहनधारकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे.











