April 23, 2026 6:56 pm

*डोंबिवली राजाजी रस्त्यावरील मासळी बाजार हटविण्याची नागरिकांची मागणी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

डोंबिवली पूर्व राजाजी रस्त्यावर कोपर उड्डाण पुलाखाली एक मासळी बाजार पदपथ अडवून भरविला जातो. या ठिकाणी रिक्षा वाहनतळ आहे. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर पदपथ अडवून हा मासळी बाजार भरत असल्याने या मासळी बाजारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मासळी खरेदीसाठी येणारे नागरिक मुख्य रस्त्यावर आपली दुचाकी, चारचाकी वाहने उभी करतात. या भागात रेल्वे स्थानक दिशेने जाणारा रिक्षा वाहनतळ आहे. रिक्षांची रांग या मासळी बाजारासमोर असते. मासळी खरेदीदार नागरिक वर्दळीच्या रस्त्यावरील, रस्त्याच्या समोरील भागात वाहने उभी करत असल्याने या भागात नेहमी पादचाऱ्यांना चालणे अवघड होते. बुधवार, शुक्रवार आणि रविवारी राजाजी रस्त्यावरील पदपथावरील मासळी बाजारात मासळी खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडते. त्यावेळी या भागातून वाहन चालकांना आपले वाहन नेणे अवघड होते.

रिक्षा चालकांना या मासळी बाजारासमोर उभे राहून आपला व्यवसाय करावा लागतो. मासळीच्या सततच्या दुर्गंधीने अनेक रिक्षा चालक त्रस्त आहेत. यापूर्वी कोपर उड्डाण पुलाजवळ टपऱ्या होत्या. रस्ता रूंदीकरणाचा विचार करून या टपऱ्या हटविण्याची नागरिकांची मागणी होती. परंतु, या टपऱ्यांना नंतर आहे त्या जागेत सुस्थितीत जागा करून देण्यात आली. याविषयी नागरिकांच्या अनेक तक्रारी यापूर्वी होत्या. परंतु, नंतर हा विषय मागे पडला.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर हा सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. या भागातील रस्ते, पदपथ नागरिकांना चालण्यासाठी सुयोग्य राहतील याची काळजी घेण्याचे आयुक्तांचे स्थानिक अधिकाऱ्यांना आदेश आहेत. अशा परिस्थितीत मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर पदपथ अडवून रिक्षा वाहनतळाच्या बाजुला एक मासळी बाजार भरविला जात असल्याने नागरिक तीव्र नापसंती व्यक्त करत आहेत. परिसरातील व्यावसायिक या मासळी बाजारातून येणाऱ्या दुर्गंधीने त्रस्त आहेत. या मासळी बाजारावर कारवाई करण्याची आणि हा मासळी बाजार पालिकेने आपल्या मासळी बाजाराच्या मोकळ्या जागेत किंवा उर्सेकर वाडीतील भाजी मंडईत स्थलांरित करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दत्तनगरमध्ये मासळी बाजार

डोंबिवली पूर्वेत दत्तनगरमध्ये टंडन रस्त्यावर मुख्य वर्दळीच्या भागात अनेक वर्ष मासळी बाजार भरतो. हा मासळी बाजार यापूर्वीपासून या भागाचे माजी नगरसेवक आणि कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजेश मोरे यांच्या प्रभागात भरतो. या मासळी बाजारामुळे नियमित या भागात वाहन कोंडी होते. रविवारी या रस्त्यावर मासळी खरेदीदारांची गर्दी असते. त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालविणे अवघड होते. हा मासळी बाजार प्रगती महाविद्यालयासमोरील उद्यानालगतच्या जलकुंभाजवळील जागेत स्थलांतरित करण्याचा ठराव पालिकेच्या महासभेने बारा वर्षापूर्वी केला आहे. पण, या ठरावाची पालिकेने अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. आमदार राजेश मोरे आणि त्यांचे चिरंजीव विद्यमान नगरसेवक हर्षल मोरे यांनी दत्तनगरमधील रस्त्यावरील मासळी बाजार अन्य भागात स्थलांतरित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आणि नागरिकांची या भागातील वाहन कोंडीतून मुक्तता करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!