मांढरदेवी ॲथलेटिक्स फाउंडेशनचा खेळाडू करण रमेश सरवदे याची जपान येथे होणाऱ्या आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी २० वर्षांखालील मुलांच्या गटात भारतीय संघात निवड झाली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे सर्वत्र हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. २१ तारखेपासून या स्पर्धा होणार आहेत.
करण सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे पद्मविभूषण वसंत दादा पाटील महाविद्यालयात इयत्ता १२ वीमध्ये शिकत आहे. गेल्या चार वर्षांपासून मांढरदेवी येथे निवासी राहून तो नियमित सराव करत असून, त्याला प्रशिक्षक राजगुरू कोचळे व धोंडिराम वाडकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
त्यांच्या योग्य प्रशिक्षणामुळे करणने सातत्यपूर्ण प्रगती साधली आहे. त्याने यापूर्वी शालेय राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांच्या गटात ३००० मीटर धावणे या प्रकारात सुवर्णपदक व क्रॉस कंट्री स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती, तसेच ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांनी घेतलेल्या आणि रांची येथे झालेल्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना त्याने उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
या कामगिरीच्या जोरावर त्याची आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. त्याच्या या यशामुळे मांढरदेवी ॲथलेटिक्स फाउंडेशनसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.











