चारचाकी वाहने चोरी करून ती स्क्रॅपमध्ये तोडून त्यांचे सुटे भाग विक्री करणाऱ्या वाहनचोरी टोळीला काळेवाडी पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून तीन लाख ३० हजार रुपयांच्या किमतीची चारचाकी वाहने व त्यांचे पार्ट हस्तगत केले आहेत.शिवा मिड्डुलाल यादव (वय २०, रा.चिखली, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना संशयित आरोपी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर असल्याचे समजताच पथकाने सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने २९ जानेवारी रोजी टाटा सुमो गोल्ड
(एमएच १४ सीएक्स २५८९) ही गाडी साथीदारासह चोरी करून मोई येथील ‘शिवा इंटरप्रायजेस’ स्क्रॅप सेंटरमध्ये तोडून तिचे पार्ट वेगळे केल्याची कबुली दिली.पंचासमक्ष झडती घेतली असता तीन चारचाकी वाहनांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे काळेवाडी, भोसरी व भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एकूण तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पुढील तपास सुरू असून, आरोपीकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त आयुक्त बसवराज तेली, सहायक आयुक्त सुनील कु-हाडे, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र बहिरट, सहाय्यक निरीक्षक वैभव गुरव व त्यांच्या पथकाने केली.











