बिजापूर/रायपूर : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त जिल्हा बिजापूरमध्ये सुरक्षा दलांचे नक्षलविरोधी ऑपरेशन सुरू आहे. रविवारी (25 जानेवारी) कर्रेगुट्टाच्या जंगलात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीचा स्फोट झाला. या घटनेत सुरक्षा दलांचे 11 जवान जखमी झाले. यानंतर जखमी जवानांना विमानानं रायपूरला नेण्यात आले. जखमींवर रायपूरच्या रामकृष्ण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत डॉ. पंकज धबालिया यांनी दुजोरा दिला आहे.
बिजापूरच्या उसुर पोलीस स्टेशन परिसरात स्फोट
हा आयईडी स्फोट बिजापूरच्या उसुर पोलीस स्टेशन परिसरात झाला. रविवारी सुरक्षा दल कर्रेगुट्टाच्या टेकड्यांमध्ये नक्षलविरोधी कारवाईची तयारी करत असताना हा स्फोट झाला. या कारवाईत जिल्हा राखीव रक्षक (DRG) आणि बस्तर फायटर्सचे जवान सहभागी होते. याशिवाय, रिझोल्युट अॅक्शन कोब्रा सीआरपीएफच्या कमांडो बटालियनची टीम देखील सहभागी होती. या स्फोटात 11 जवान जखमी झाले, ज्यामध्ये डीआरजीचे 10 आणि कोब्रा बटालियनच्या एका जवानाचा समावेश आहे.
रायपूरमधील रामकृष्ण रुग्णालयात उपचार सुरू
रामकृष्ण रुग्णालयाचे डॉ. पंकज धबालिया यांनी माध्यमांना सांगितलं की, “आयईडी स्फोटात जखमी झालेल्या 11 जवानांना रायपूरमधील रामकृष्ण रुग्णालयात आणण्यात आलं. एका जवानाला प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तर 11 जवानांवर अजूनही रामकृष्ण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी चार ते पाच जण गंभीर जखमी आहेत आणि काही जवानांवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.”
रविवारी बिजापूरमध्ये झालेल्या स्फोटानंतर, रामकृष्ण रुग्णालयातील आपत्कालीन कक्षात 11 जवानांना आणण्यात आले. त्यापैकी चार ते पाच जवानांची प्रकृती गंभीर आहे, परंतु नियंत्रणात आहे. चार जखमी जवानांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, त्यांच्या पायाच्या बोटाला आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे. इतर पाच ते सहा जखमी जवानांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आणि ते धोक्याबाहेर आहेत. काल, 11 जखमी जवानांना रामकृष्ण रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यापैकी एकाला प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. – डॉ. पंकज धबालिया, ऑर्थोपेडिक सर्जन, रामकृष्ण रुग्णालय, रायपूर
संपूर्ण परिसरात अलर्ट जारी :
आयईडी स्फोटात जखमी झालेल्या सर्व 11 जवानांना काल रात्री उशिरा लष्कराच्या एमआय-17 हेलिकॉप्टरनं रायपूर इथं चांगल्या उपचारांसाठी नेण्यात आलं. रामकृष्ण रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, सर्व जखमी जवान धोक्याबाहेर आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली आहे. तसंच अलर्ट जारी करण्यात आला.
नक्षलवाद्यांविरोधात गेल्या वर्षी केली होती मोठी कारवाई :
नोव्हेंबर 2025 मध्ये, सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान मानल्या जाणाऱ्या कर्रेगुट्टा येथील उसुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या तडपाला गावात एक छावणी उभारली होती. एप्रिल-मे 2025 मध्ये, केंद्रीय आणि राज्य सुरक्षा दलांनी कर्रेगुट्टा टेकड्यांच्या सभोवतालच्या घनदाट जंगलात 21 दिवसांची मोठी कारवाई केली, ज्यामध्ये 31 नक्षलवादी ठार झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांने 35 शस्त्रे, 450 आयईडी आणि मोठ्या प्रमाणात डिटोनेटर, स्फोटके आणि वैद्यकीय साहित्य, विद्युत उपकरणं आणि नक्षलवादी साहित्यासह इतर साहित्य जप्त केलं होतं.











