पुणे : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बिबवेवाडी परिसरात मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांना सामाजिक कार्यकर्ते कुमार उर्फ बापू नायर यांनी उपस्थिती लावत नागरिकांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
बिबवेवाडी भागातील शाळा, शैक्षणिक संस्था तसेच सामाजिक संस्थांच्या कार्यालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवर्ग, संस्थांचे पदाधिकारी तसेच समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीताने परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला.
कार्यक्रमानंतर कुमार उर्फ बापू नायर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना खाऊ वाटप केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षण हीच खरी ताकद असून शिस्त, परिश्रम, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जाणीव या मूल्यांवरच देशाचे उज्ज्वल भविष्य अवलंबून आहे. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेत यश मिळवण्यापुरते मर्यादित न राहता जबाबदार व सजग नागरिक घडण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, संविधानाविषयी आदर आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे बिबवेवाडी परिसरात आनंदी व उत्साही वातावरण निर्माण झाले.











