बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान किती लोकप्रिय अभिनेता आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. भारतातच नव्हे, तर अमेरिका आणि युरोपमध्येही त्याचे चाहते आहेत. त्याचे चित्रपट जगभरात मोठ्या आवडीनं पाहिले जातात. मग विचार करा, इतका मोठा सुपरस्टार अचानक तुमच्या शेजारी आला तर तुमची काय अवस्था होईल. असाच काहीसा प्रकार काही तरुणांसोबत घडला. रिक्षातून प्रवास करत असताना शेजारच्या गाडीत शाहरुख खान बसलेला दिसताच पुढे जे काही घडलं, ते पाहून तुमचंही हसू आवरणार नाही. या तरुणांनी शाहरुखला भेटण्यासाठी जे काही प्रयत्न केले, ते पाहण्यासारखे आहेत.
रात्रीची वेळ होती. शाहरुख आपल्या आलिशान रोल्स रॉयस कारमधून प्रवास करत होता. गाडीभोवती पोलिसांचं सुरक्षाकवच होतं. मात्र रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणांना खिडकीतून शाहरुखची झलक दिसली. त्यांनी शाहरुखच्या नावानं ओरडायला सुरुवात केली. गाडीतून कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्याने त्यांनी रिक्षातून त्याच्या कारचा पाठलाग केला.
या व्हिडीओतील गंमत म्हणजे पोलिसांना घाबरून रिक्षावाला सुरुवातीला पाठलाग करायला तयार नव्हता. मात्र तरुणांनी हुशारीनं काम घेतलं. एकानं “माझे वडील कलेक्टर आहेत” अशी थाप मारली, तर दुसऱ्यानं “मी दिल्लीचा आहे आणि शाहरुख मला ओळखतो” असं सांगितलं. अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर रिक्षा शाहरुखच्या कारशेजारी जाऊन उभी राहिली.
हा व्हिडीओ abhisaxy या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत तो ३८ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी याला ‘एव्हरेज फॅन मूव्हमेंट’ म्हटलं, तर काहींनी रिक्षावाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. काही लोकांना शाहरुखपेक्षा त्याची गाडीच अधिक भावल्याचंही दिसून आलं आहे. असो, हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हीही आपल्या प्रतिक्रिया द्या.











