जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे च्या टीम अभ्युदय रेसिंग ने प्रतिष्ठित एसएईइंडिया ई-बाहा 2026 स्पर्धेत ऑल इंडिया रँक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. देशभरातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांशी स्पर्धा करत, संघाने आपल्या इलेक्ट्रिक ऑफ-रोड वाहनासह चार तासांची कठीण एंड्युरन्स रेस पूर्ण केली. यामध्ये उत्कृष्ट अभियांत्रिकी कौशल्य, विश्वसनीयता, टीमवर्क आणि नवकल्पनांचे प्रभावी दर्शन या संघाच्या सदस्यांनी केले.
या यशामुळे रायसोनी कॉलेज पुणेची अनुभवाधारित शिक्षणपद्धती, उद्योग-सुसंगत शिक्षण आणि इलेक्ट्रिक वाहन व मोटरस्पोर्ट तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांची वाढती क्षमता अधोरेखित झाली आहे. या यशात आणखी भर घालत, टीम अभ्युदय रेसिंगच्या मार्गदर्शक डॉ. आशा शेंडगे यांना विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन दिल्याबद्दल द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
टी अभ्युदयच्या दमदार कामगिरीमुळे उद्योग क्षेत्रातूनही मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेक आघाडीच्या ऑटोमोबाईल व मोबिलिटी कंपन्यांनी विद्यार्थ्यांना प्लेसमेंट व करिअर संधी देऊ केल्या आहेत. यामध्ये बीपीसीएल, अॅडव्हान्टेक फ्युएल, एमिटेक, जनरल मोटर्स, होंडा, एका मोबिलिटी, महिंद्रा अॅन्ड महिंद्रा, रोड सेफ्टी विथ स्टार्केन, ऑटोलिव्ह, हिरो मोटोकॉर्प, नामटेक, टीव्हीएस मोटर, व्हॅरॉक आणि व्हीईसीव्ही यांचा समावेश आहे.
यावेळी बोलताना रायसोनीचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर, म्हणाले, एसएईइंडिया ई-बाहा 2026 मधील टीम अभ्युदय रेसिंगची कामगिरी ही नवकल्पना आणि अनुभवाधारित शिक्षणाची खरी ओळख आहे. उद्योगाभिमुख शिक्षण, सक्षम मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची जिद्द यामुळे जागतिक स्तरावरील अभियंते घडविण्यास मदत होईल. आम्ही इलेक्ट्रिक वाहन अभियांत्रिकी आणि टीमवर्कद्वार नव निर्मितीचे प्रयत्न करत आहोत.
रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष श्री. सुनील रायसोनी, कार्यकारी संचालक श्री. श्रेयस रायसोनी, कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर आणि प्रभारी संचालक डॉ. एन. बी. हुल्ले यांनी टीम अभ्युदय रेसिंगचे या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन केले.











