पुणे : नांदेड – पुणे एक्सप्रेस सह हरंगुळ (लातूर) – पुणे स्पेशल ही रेल्वे मराठवाड्यातून येणाऱ्या विविध रेल्वे पुणे जंक्शनऐवजी हडपसर स्थानकावर थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय 26 जानेवारीपासून लागू केला जाणार आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील प्रवाशांची चांगलीच गैरसोय हेाणार आहे. या निर्णयाविरोधात रेल्वे संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यात थांबा नसल्याने प्रवाशांना हडपसरमध्ये त्रास
नांदेड-पुणे एक्स्प्रेस हडपसर येथे पहाटे 4.30 वाजता पोहोचते. यावेळी त्या परिसरात कोणतीही पुणे महानगर पालिकेची बस सेवा नाही. त्याच बरोबर खासगी वाहने अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. पिंपरी-चिंचवड, शिवाजीनगर, स्वारगेट, मनपा, खराडी याठिकाणी जाण्यासाठी थेट कनेक्टिव्हिटी नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होणार आहे. याचा फटका वृद्ध, महिला, विद्यार्थी आणि दररोज पुण्यात नोकरीसाठी प्रवास करणाऱ्या शेकडो मराठवाड्यातील प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातून पुण्याला जाणाऱ्या अनेक रेल्वे 26 जानेवारीनंतर हडपसरपर्यंतच धावणार आहे. तत्कालीन रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या काळात नांदेड हडपसर ही रेल्वे चालवण्यात आली होती. ही रेल्वे हडपसरपर्यंत चालवल्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत होती. यानंतर श्री दानवे यांनी ही रेल्वे पुण्यापर्यंत नेण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केली. या नंतर ही रेल्वे नांदेड ते पुणे अशी धावत आहेत.
दरम्यान पुणे रेल्वे स्टेशनचे काम सुरू होणार आहे. यामुळे पुणे स्टेशन येथे थांबणाऱ्या रेल्वे अन्य रेल्वे स्टेशनवर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यात नांदेड ते पुणे सह अन्य रेल्वेचाही समावेश आहे. नांदेड पुणे सह मराठवाड्यातून पुण्याला जाणाऱ्या रेल्वे पुण्याला थांबण्याची व्यवस्था करण्यात आली नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा मराठवाड्यातील संघटनांकडून देण्यात आला आहे.
रेल्वे पुढे नेण्याची मागणी
गुजरातसह उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना सोयीचं व्हावं. यासाठी गुजरात आणि उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वेला पुण्यात थांबण्याची व्यवस्था आहे. मात्र, मराठवाड्यातून आलेल्या जागा नाही, असे कारण दिले जाते. मराठवाड्यातील रेल्वे प्रवासी संघटनांना गुजरातसह उत्तर भारताकडे जाणाऱ्या रेल्वेला हरंगुळपासून जेजुरीपर्यंत थांबण्याची व्यवस्था करावी अशी मागणी आहे.











