पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. पुणे महापालिकेत भाजपने 90 जागांवर आघाडी घेतली असून, बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 82 जागांचा आकडा पार केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपने 74 जागांवर आघाडी घेत सत्ता कायम राखण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट म्हणजेच अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला दोन्ही शहरांमध्ये मोठा फटका बसला आहे. पुणे महापालिकेत राष्ट्रवादी आघाडीला केवळ 41 जागांवर समाधान मानावे लागत आहे. या निवडणुकीत काँग्रेसनेही आपले खाते उघडले असून, प्रशांत जगताप यांनी विजय मिळवला आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवल्याचं चित्र सध्याच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या 165 जागांसाठी झालेल्या मतमोजणीत भाजपने मोठी मुसंडी मारली आहे. पुणे महापालिकेत भाजपने 90 जागांवर आघाडी घेतली आहे, तर पिंपरी चिंचवडमध्ये 74 जागांवर आघाडी मिळवत भाजपने सत्ता कायम राखली आहे. पुणे महापालिकेत बहुमतासाठी 82 जागांची आवश्यकता असताना भाजपने 90 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुण्यात भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तर, पिंपरीचिंचवड महानगरपालिकेच्या 128 जागांसाठी झालेल्या लढतीत भाजपने 74 जागांवर आघाडी घेत सत्ता कायम राखण्याच्या दिशेने कूच केली आहे.
दुसरीकडे, निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ सोडत अजित पवारांनी पुन्हा एकदा काका शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पिंपरी-चिंचवड जिंकून दाखवू असा एल्गारही त्यांनी केला होता. पुन्हा एकदा काका-पुतणे एकत्र आल्याने पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, पुणेकरांनी आपला कौल हा भाजपला देत काका-पुतण्याच्या जोडीला नाकारल्याचं दिसत आहे. या दोन्ही पक्षांना पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा पराभव स्विकारावा लागत आहे. सध्याच्या कलांनुसार, अजित पवारांचा पक्ष 7 तर शरद पवारांचा पक्ष 3 जागांवर आघाडीवर आहे.











