April 23, 2026 11:54 pm

ऑनलाइन कॅब बुक करून चालकाला ताम्हिणी घाटात संपवलं

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

ऑनलाइन कॅब बुक करून चालकाला ताम्हिणी घाटात नेऊन माणगावच्या हद्दीत खून केल्याच्या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला. आरोपीच्या घरी पंचनामा केला जात असताना पोलिस अंमलदाराच्या हाताला झटका देऊन आरोपी पळाला. ही घटना बुधवारी (१४ जानेवारी) हिंगणे परिसरात घडली. त्याच्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शोध सुरू आहे.

 

अनिकेत महेश वाघमारे (वय २६, रा. लक्ष्मीविहार अपार्टमेंट, रोकडोबा मंदिराजवळ, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्याप्रकरणी त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई श्रीकांत किरवले (वय २९) यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या खून प्रकरणात वाघमारे आणि तुषार ऊर्फ सोन्या शरद पाटोळे (वय २४, रा. सुशीलगंगा अपार्टमेंट, कर्वेनगर) यांना बाणेर पोलिसांनी चोरीची कार विक्री करताना कात्रज-देहूरोड बायपास रस्त्यावरून अटक केली होती. त्यांनी माणगावच्या हद्दीत खून केल्याचे समोर आल्यानंतर बाणेर पोलिसांनी माणगाव पोलिसांना माहिती देऊन आरोपींना त्यांच्या ताब्यात दिले होते. माणगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता.

या गुन्ह्याच्या तपासासाठी माणगाव पोलिसांचे पथक बुधवारी (१४ जानेवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वाघमारेला घेऊन सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द येथे आले. घराचा पंचनामा सुरू असताना वाघमारेने पोलिस शिपाई किरवले यांना धक्का देऊन पळ काढला. त्यानंतर माणगाव पोलिसांनी ही माहिती सिंहगड रस्ता पोलिसांना दिली. पसार आरोपीचा शोध सुरू असून, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास कदम तपास करीत आहेत.

आरोपींनी कॅब बुक करून चालकाला ताम्हिणीमार्गे माणगावच्या हद्दीत नेले. तेथे चालकाचा खून करून त्याची कार पळवली होती. कारचालकाचा मृतदेह ११ जानेवारीला आढळून आला. त्या वेळी माणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला, तर १३ जानेवारीला बाणेर परिसरात चोरीची कार विक्रीच्या प्रयत्नात असताना अनिकेत वाघमारेला बाणेर पोलिसांनी पकडले. त्या वेळी खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!