मुंबई : प्रभाग क्रमांक २०४ मध्ये उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बाहेर पडून माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी बंडाचे निशाण फडकावले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करुन तिकीट मिळवत कोकीळ यांनी ठाकरेंना डिवचले. मात्र ठाकरे समर्थकांनी कोकीळ यांना चांगलाच इंगा दाखवल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि उबाठाचे उमेदवार किरण तावडे यांनी कोकीळ यांना पराभवाची धूळ चारली आहे.
नरेंद्र अवधूत (काँग्रेस) रिंगणात असतानाही अनिल कोकीळ यांनी बंडखोरी करत शिवसेनेकडून तिकीट मिळवल्यामुळे या दोघांमध्येच खरी लढत झाली. लालबागचा राजाचे मानद सचिव आणि शिवसेनेचे सचिव सुधीर साळवी यांचेही या प्रभागात वर्चस्व असल्याने शिवसेना उबाठाचे पारडे जड मानले जात होते.
परळ-लालबाग हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथील वॉर्ड क्रमांक २०३ आणि २०४ मधून शिवसेनेच्या नगरसेवकपदाच्या उमेदवारांनी सहज निवडणुका जिंकल्या आहेत. नारायण राणेंचं बंड, राज ठाकरेंची शिवसेनेला सोडचिठ्ठी किंवा एकनाथ शिंदे यांचे बंड यात परळ-लालबागने नेहमीच ठाकरे कुटुंबाला साथ दिली आहे.
कम्युनिस्टांचा हा गड बाळासाहेबांनी तरुण शिवसैनिकांच्या बळावर जिंकला होता, मात्र यावेळी परळ लालबागलाही बंडखोरीने पोखरल्याचे दिसले. वॉर्ड क्रमांक २०४ मधून उद्धव ठाकरे यांनी शाखाप्रमुख आणि मुंबईचा राजा गणेशोत्सव (गणेश गल्ली) मंडळाचे अध्यक्ष किरण तावडेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर अर्ध्या तासात त्यांना वॉर्ड क्रमांक २०४ मधून उमेदवारी देण्यात आली. मात्र कोकीळ यांच्या बंडखोरीनंतर सामान्य शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.











