पुण्यात उद्या भोर, राजगड, पुरंदरसह महाराष्ट्रातील पैलवानांचा भव्य स्नेह मेळावा; कुस्ती व राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती
पुणे:
भारतीय मातीतील पारंपरिक कुस्ती संस्कृती जपण्याच्या आणि पैलवानांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी पुणे शहर आणि प्रभाग क्रमांक ३८ (बालाजीनगर–कात्रज–आंबेगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, राजगड तसेच शिवगंगा खोऱ्यातील आजी-माजी पैलवान व वस्ताद मंडळींचा भव्य ‘पैलवान स्नेह मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.
हा स्नेह मेळावा रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता कात्रज परिसरातील भारती विद्यापीठ येथील जिजामाता चौक (चव्हाण पॅराडाईज समोर) येथे उत्साहात संपन्न होणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३८ मधील बालाजीनगर, कात्रज, आंबेगाव, मांगडेवाडी, भिलारवाडी, गुजर निंबाळकरवाडी या परिसरात वास्तव्यास असलेले तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध तालुक्यांतून पुण्यात स्थायिक झालेले पैलवान, कुस्तीगीर, वस्ताद आणि क्रीडा क्षेत्राशी निगडित कार्यकर्ते यांना एका व्यासपीठावर आणणे, त्यांच्याशी थेट संवाद साधणे आणि पारंपरिक कुस्तीला बळ देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे.
या मेळाव्यात कुस्ती क्षेत्रातील मान्यवर दिग्गजांसह राजकीय क्षेत्रातील प्रमुख नेते, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, पैलवानांच्या समस्या, कुस्ती माळा, सराव केंद्रे, खेळाडूंचे भविष्य, तसेच क्रीडा क्षेत्राला मिळणाऱ्या शासकीय सुविधा यावर सकारात्मक चर्चा होणार आहे. पैलवानांच्या योगदानाचा सन्मान करणे आणि त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे.
कार्यक्रमाचे तपशील :
स्थळ : चव्हाण पॅराडाईज समोर, जिजामाता चौक, भारती विद्यापीठ, पुणे
दिनांक : रविवार, ११ जानेवारी २०२६
वेळ : सायंकाळी ६.०० वाजता
या भव्य स्नेह मेळाव्याचे आयोजन प्रभाग क्रमांक ३८ मधील प्रमुख पदाधिकारी
सौ. अश्विनी अमर चिंधे, मा. श्री. संदिप बाळूसाहेब बेलदरे, सौ. राणी रायबा भोसले, सौ. प्रतिभा रोहिदास चोरघे आणि मा. श्री. व्यंकोजी मारुती खोपडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
भोर, राजगड, मुळशी, पुरंदर, शिवगंगा खोरे तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील आजी-माजी पैलवान, वस्ताद मंडळी आणि कुस्तीप्रेमींनी या स्नेह मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक व समस्त पैलवान मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.
कुस्ती परंपरेचा गौरव, पैलवानांशी संवाद आणि क्रीडा संस्कृतीला नवी दिशा देणारा हा स्नेह मेळावा क्रीडाप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.











