पुणे : टोरंट गॅस कंपनीने कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि पाईप्ड नॅचरल गॅसच्या (पीएनजी) दरात कपात केली आहे. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो एक रुपया आणि पीएनजीच्या (घरगुती गॅस) दरात प्रति घनमीटर एक रुपया कपात करण्यात आली आहे. टोरंट कंपनीकडून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा केला जात असल्याने तिथे ही कपात लागू झाली आहे.
टोरंट गॅस कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळाच्या आदेशाच्या अंमलबजावणीमुळे सीएनजी आणि पीएनजीच्या दरातील ही कपात झाली आहे. मंडळाचा आदेश १ जानेवारीपासून लागू झाला आहे. कंपनीकडून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा केला जातो. त्यामुळे ग्रामीण भागात आता सीएनजी आणि पीएनजीचा दर कमी झाला आहे. या कपातीमुळे पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी ४१.२६ टक्क्यांपर्यंत स्वस्त झाला आहे. टोरंट गॅसची पुणे जिल्ह्यात ७४ सीएनजी स्टेशन आहेत.
सीएनजी आणि पीएनजीच्या दरातील कपात ही स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना आणि सीएनजी वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. यामुळे सामान्य माणसाचे घरगुती खर्च कमी होतील. या निर्णयामुळे नैसर्गिक वायूच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळाच्या देशव्यापी मोहिमेला गती मिळणार आहे. याचबरोबर घरांमध्ये नवीन पीएनजी जोडणीस चालना मिळेल आणि प्रवासी व व्यावसायिक सीएनजी वाहनांच्या विक्रीला प्रोत्साहन मिळेल, असे टोरंट गॅस कंपनीने म्हटले आहे.











